केस गळतीवर वेळीच करा उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृणाल घनकुटे

खराब जीवनशैली, आहार, वैद्यकीय विकार आणि आनुवंशिक समस्यांसह विविध कारणांमुळे आपल्यापैकी बरेच जण आता कमी वयात केस गळण्याची समस्या अनुभवत आहेत. केस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उपचार उपलब्ध आहेत. ज्यात ‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट’ (जीएफसी) ट्रीटमेंट ही सध्या चर्चेत आहे.

फायदे नेमके कोणते

जीएफसी उपचार पद्धती केस गळती कमी करण्यास मदत करते आणि केस घनदाट बनवण्यासाठी फायदेशीर आहे. सामान्य प्रमाणापेक्षा जेव्हा अधिक केस गळती होते, म्हणजेच अलोपेसियाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जे आहेत, त्यांच्यासाठी ‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट’ उपचार पद्धती अत्यंत योग्य आहे. हे पुरुष आणि स्त्र्ाया दोघांसाठी योग्य आहे. हे लक्षात घेणेदेखील आवश्यक आहे की, केसांसाठी जीएफसी उपचार पद्धतीचे परिणाम दिसण्यासाठी 3-4 सत्रे हवीत. जीएफसी पद्धती शुद्ध असल्याने आणि त्यात कोणतेही आरबीसी किंवा डब्ल्यूबीसी नसल्यामुळे वेदना किंवा जळजळ होण्याचा धोका कमी असतो.

‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट’ म्हणजे काय?

‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट’ (जीएफसी) ट्रीटमेंटबाबत विवा ऍस्थेटिक क्लिनिकच्या तज्ञ डॉ. दीपम शाह यांनी माहिती दिली. त्यानुसार, आपल्या प्लेटलेट्समध्ये वाढीचे विविध घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात. हेच वाढीचे घटक तुमच्या रक्तातून ‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट’ म्हणून एका किटमध्ये काढले जातात आणि केसांच्या मुळाशी इंजेक्ट केले जातात. ट्रीटमेंट केल्यानंतर केस गळणे कमी होणे, केसांची जाडी सुधारणे, केसांची मात्रा वाढणे असे फायदे होतात.

उपचारांनंतर केसांची कशी घ्यावी काळजी

एका दिवसासाठी आपले केस किंवा टाळूला कंगव्याने किंवा हाताने स्पर्श करणे टाळा. प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुमारे चार दिवस अति थकवणारा व्यायाम आणि जड कसरत यामुळे घाम येणे टाळा. एक-दोन दिवस केसांना शॅम्पू करू नका आणि त्यानंतर फक्त डॉक्टरांनी सुचवलेली उत्पादने लावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक औषधे किंवा औषधांचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.