
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या निमित्ताने मुंबईत आलेले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा दौरा वादग्रस्त ठरला आहे. महाराष्ट्रात येणारे लाखो कोटी रुपयांचे रोजगार गुजरातला पळवल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्राच्या उद्योगांवर धाड घालण्यासाठी पटेल मुंबईत आले असल्याची टीका होत आहे.
व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने महाराष्ट्रातील आणि मुंबईतील उद्योगांना गुजरातकडे आकर्षित करण्याचा भूपेंद्र पटेल यांचा उद्देश आहे. त्यांनी आज महाराष्ट्रातील अनेक उद्योगपतींची भेट घेतली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, पी अॅण्ड जीचे व्यवस्थापकीय संचालक ए. व्ही. वैद्यनाथन यांच्याशीही पटेल यांनी संवाद साधला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी गुजरात हे राज्य गुंतवणुकीसाठी देशात नंबर वन असल्याचा दावा पटेल यांनी केला.
गुजरातला पाठवतात रोजगार! मिंधे सरकार रोज गार!!
‘गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत… ‘व्हायब्रंट गुजरात’ रोड शोसाठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत यासाठी हा खटाटोप. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांटउडय़ा मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता!’ असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हाणला. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस-टाटा, 40 गद्दार… सगळंच तर पाठवलं तिथे. अजून काय पाहिजे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम मात्र होऊ नाही शकला. कारण या खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार तिथे पाठवतंय! शेवटी ‘गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार!!!’ असा हल्ला त्यांनी चढवला.
मिंधे सरकारमध्ये गुजरातचे हस्तक; काँग्रेसचा हल्ला
व्हायब्रंट गुजरातबद्दल यावेळी माध्यमांनी पटोले यांना विचारले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत, कारण सरकारमध्येच गुजरातचे हस्तक बसले आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.



























































