Gujarat Polls सूरतमध्ये केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक, ‘आप’ समर्थकांचा भाजपवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस बाकी असल्याने सर्व पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. यंदा गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल संपूर्ण गुजरात पालथा घालत आहेत.

अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये रस्त्यावरही उतरले असून आणि जनसभाही घेत आहेत. आजही त्यांनी सूरतमध्ये रोड शो काढला. याच रोडो शो दरम्यान केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. हा रोड शो कव्हर करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यालाही दगड लागले. दगडफेक चालू झाल्यानंतर केजरीवाल गाडीमध्ये बसले आणि सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा रोड शो सुरू झाला.

केजरीवाल यांच्या ताफ्यावर सूरतमध्ये रोड शो सुरू असलेल्या भागातील एका गल्लीतून दगडफेक करण्यात आली. केजरीवाल सन रूफमधून बाहेर येऊन रस्त्यावर जमा झालेल्या लोकांना हात हलवून अभिवादन करत होते. याचवेळी अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे केजरीवाल सुरक्षेच्या घेऱ्यात पुन्हा गाडीत बसले. या दरम्यान आपचे समर्थक आणि दगडफेक करणाऱ्यांमध्ये मोठा राडाही झाला.

केजरीवालांनी लिहून दिले… गुजरातच्या जनतेची भाजपच्या तावडीतून सुटका होणार

दरम्यान, शनिवारी सूरतमध्ये आप नेते गोपाल इटालिया यांचीही एक सभा झाली. कतारगाम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गोपाल इटालिया याच्याद्वारे आयोजिक करण्यात आलेल्या या सभेमध्येही दगडफेक झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या दगडफेकीमध्ये एक मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर आपने सभा रद्द केली. गोपाल इटालिया यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या दगडफेक करणाऱ्यांना जनता झाडूने उत्तर देईल, असे त्यांनी म्हटले.