गुवाहाटी पोलिसांनी 55 कोटींचे 37 किलोचे सोने केले जप्त; महाराष्ट्रातील आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये गुवाहाटी पोलिसांनी खारघुली येथे केलेल्या शोधमोहिमेदरम्यान ५५ कोटी रुपये किमतीचे ३७ किलो २४-कॅरेट सोने आणि चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रातील ३२ वर्षीय अक्षय बनसोडे याला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, तो दोन महिन्यांपासून गुवाहाटीमध्ये राहत होता आणि त्याने यापूर्वी २० किलो सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या संशयास्पद आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास केला जात आहे.

यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच देशातील इतर काही शहरांमध्ये याचे धागेदोरे असल्याचा संशय आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यात त्यांना यश आले आहे. गुवाहाटी पोलिसांनी केलेली ही मोठी कामगिरी असून जप्त करण्यात आलेले सोने आतापर्यंतचे सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.