ट्रेंटनंतर आता व्होल्टासचे अध्यक्षपद सोडणार; नोएल टाटा यांचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशासह जगभरात नावाजलेला उद्योगसमूह म्हणून टाटा समूहाची ओळख आहे. आता टाटा समुहात मोठी घडामोड होत आहे. ट्रेंटचे अध्यक्षपद सोडल्यानंतर आता सुमारे एका आठवड्याने नोएल टाटा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंगळवारी घोषणा केली की, ते टाटा समूहाची दुसरी कंपनी असलेल्या व्होल्टासचे अध्यक्षपदही सोडणार आहेत.

यापूर्वी २३ जून रोजी देशातील आघाडीची फॅशन आणि लाइफस्टाइल रिटेलर असलेल्या ट्रेंटच्या भागधारकांना संबोधित करताना नोएल टाटा यांनी ट्रेंटचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. नोएल टाटा हे टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्षही आहेत.

नोएल टाटा यांनी कंपनीच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) ही घोषणा केली. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना, नोएल टाटा यांनी घोषणा केली की व्होल्टासचे अध्यक्ष म्हणून ही त्यांची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल. तुम्हाला माहीत असेलच, अध्यक्ष म्हणून ही माझी शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, असे ते म्हणाले.

नोएल टाटा २७ जानेवारी २००३ रोजी व्होल्टासच्या संचालक मंडळात सामील झाले. इशात हुसेन यांच्या जागी १ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांची व्होल्टासचे गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोएल टाटा हे टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष देखील आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते ७० वर्षांचे होतील. कंपनी कायदा २०१३ नुसार, कोणताही व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्ण-वेळ संचालक ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असल्यास त्याची नियुक्ती केली जाऊ शकत नाही किंवा तो हे पद भूषवू शकत नाही.