
रत्नागिरी जिल्ह्याला काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गोवळ खालचीवाडी, विल्ये, दोनिवडे गवळीवाडी येथे घराशेजारच्या संरक्षक भिंत कोसळल्या आहेत.
यंदा पावसाचे उशीराने आगमन झाल्यामुळे सर्वजण चिंतेत होते. मात्र, जून अखेरीस पावसाने दमदार सलामी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०५ मिमी पाऊस पडला त्यामध्ये मंडणगड १२० .२५ मिमी, दापोली १०५ मिमी,खेड ६५.१४ मिमी, चिपळूण ८७.७७ मिमी, गुहागर १२७ मिमी, संगमेश्वर ११० मिमी, रत्नागिरी १४३.७७ मिमी, लांजा ८४ मिमी आणि राजापूरमध्ये १०६.२५ मिमी पाऊस पडला.
राजापूर तालुक्यामध्ये पडझड होवून नुकसान झाले आहे. त्यामध्ये गोवळ खालचीवाडी, विल्ये, दोनिवडे गवळीवाडी येथे घराशेजारच्या संरक्षक भिंत कोसळल्या आहेत. तर, साखर सडेचव्हाणवाडी येथे घरावर झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अर्जुना-कोदजवली नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असली तरी, त्यामध्ये कोणताही पूराची धोकादायक स्थिती निर्माण झालेली नाही.
अनेक दिवसांच्या खंडानंतर पुरागमन केलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून सातत्य राखले आहे. सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस पडत असून पावसाचा जोर आज दिवसभर कायम राहीलेला आहे. सातत्याने पडणार्या या पावसाने तालुक्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये शंभरी गाठली आहे. पावसाच्या या सातत्यामध्ये तालुक्यामढ्ये पडझड होवून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, सातत्याने पडणार्या या पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.
शीळ धरण भरले
पाऊस लांबल्याने रत्नागिरी शहराला पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला होता. मात्र आठवडाभर पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरले आहे त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले आहे.


























































