Ratnagiri News – लांबलेल्या पावसाने नाचणीची उगवण उशीरा; लागवड रखडल्याने बळीराजा चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक असलेल्या नाचणीच्या लागवडीला यंदा लांबलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ‘पोएसी’ (Poaceae) गवतवर्गीय कुळातील आणि ‘इलुसिन कोराकाना’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या एकदलवर्गीय पिकाची वैशिष्ट्ये म्हणजे हे बदलत्या हवामानास अनुकूल असून, प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहते. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने मे महिन्याच्या शेवटी धूळवाफेवर पेरणी केलेल्या नाचणीची उगवण अत्यंत उशिरा होत आहे. डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये जमीन तयार करून जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात केली जाणारी नाचणी आणि भाताची लागवड यंदा पावसामुळे पूर्णपणे रेंगाळली आहे.

नाचणी हे केवळ एक पीक नसून ते आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी व औषधी मानले जाते. आजच्या काळात शहरांमध्ये नाचणीची भाकरी, खीर, वड्या, पापड आणि नाचणी सत्त्व यांसारख्या विविध पदार्थांना मोठी मागणी असून ते चढ्या दराने विकले जातात. परंतु, दुर्दैवाने ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांना या बाजारपेठेची आणि योग्य मूल्याची पुरेशी कल्पना नाही. अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नाचणी पिकाचे व्यावसायिक महत्त्व पटवून देणे आणि आधुनिक पद्धतीने पीक वाढीसाठी मार्गदर्शन करणे गरजेचे असताना, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.