
वणी शहरात नेक वसुलीच्या अधिकारावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये मंगळवारी वाद उफाळून आला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होताच दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांमध्ये लेखी समझोता झाल्याने प्रकरण निवळले.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील तृतीयपंथीयांचा गट गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात विवाह, बाळाचा जन्म, गृहप्रवेश तसेच इतर मांगलिक प्रसंगी नेक वसुलीचे काम करीत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अमरावती आणि यवतमाळ येथील दुसरा किन्नर गटही वणी शहरात नेक वसुली करू लागल्याने उत्पन्नाच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला.
या प्रश्नावर दोन्ही गटांमध्ये यापूर्वीही तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, कोणताही निर्णय न झाल्याने मंगळवारी पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले. वाद चिघळून धक्काबुक्की व मारहाणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
घटनेनंतर दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच होते. यानंतर पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींशी सुमारे दोन तास चर्चा करून समुपदेशन केले. अखेरीस दोन्ही पक्षांनी शहरात शांतता राखण्याचे आणि एकमेकांच्या नेग वसुलीच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या घटनेची माहिती शहरभर पसरताच वणी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली. घडामोडी जाणून घेण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणताही तृतीयपंथीय अथवा इतर व्यक्ती जबरदस्तीने नेक किंवा पैशांची मागणी करत असेल, दबाव टाकत असेल किंवा त्रास देत असेल, तर नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी. अशा प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.




























































