वादळी वाऱ्यासह गारपीट, रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यातील काही गावच्या ठिकाणी गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोसंबी, संत्री आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातीलच सावळी येथील एका शेतकऱ्याची मोसंबीची बाग अक्षरश: जमिनीवर गळून पडली आहे.

जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागची दशा फिटता फिटेना. बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास तालुक्यातील सावळी, घडोळी, केहाळ, इटोली, हिवरखेडा, सावंगी म्हाळसा, मुरूमखेडा आदी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात काही ठिकाणी अक्षरशः गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोसंबी, संत्री आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील 4-5 वर्षापासून याभागात गारपीट ही रब्बी हंगामात नित्याची होऊन बसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मागील वर्षी सोयाबीन अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाले होते आता गहू, हरभरा ही नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.

बुधवार, 17 मार्च रोजी पहाटे या भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. मात्र आज 18 च्या पहाटे सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच काही भागात गारपीटही झाली या अवकाळी पावसामुळे परिसरातील काढणीला आलेल्या गहू ज्वारी हरभरा या पिकांसह संत्रा, मोसंबी या फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील सावळी येथील रामराव वाघ यांची मोसंबीची बाग वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे अक्षरशहा जमिनीवर गळून पडली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच सावळी येथील गजानन नागरे यांच्या हरभरा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हिवरखेडा घडोळी, घडोळी तांडा, इटोली , मुरूमखेडा, केहाळ, सावंगी म्हाळसा आदी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पूर्णा : शहरासह तालुक्यातील 30 ते40 गावात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले रब्बी पीक निसर्गाने उडून गेली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बुधवार, 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्यान पूर्णा शहराचा तालुक्यातील कत्नेश्वर, निळा, चुडावा, कावलगाव आदी परिसरातील 30 ते 40 गावाच्या शेतातील गहू, ज्वारी ही पिके पूर्ण आडवी पडली. तर त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. तास भर पडलेल्या या पावसांमध्ये तब्बल रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साचले होते. तसेच संत्रा उत्पादकांची गाव असलेल्या चुडावा, पिंपळा लोखंडे या गावांमध्ये तर संत्र्यांच्या बागा पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. संत्र्याच्या झाडाखाली फळांचा सडा दिसून आला तर दुसरीकडे शेतकऱ्यानी हरभरा काढण्याची तयारी जोरात सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे मोठी गैरसोय झाली.