मोदींच्या सभेत निम्म्यावर खुर्च्या रिकाम्याच; बढाई लाखांची, उपस्थिती हजारांची

पुणे जिह्यातील महायुतीच्या चार उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठा गाजावाजा करून घोषित करण्यात आलेली दोन लाख लोकांची सभा प्रत्यक्षात काही हजारामध्ये गुंडाळावी लागली. मागील बाजूस निम्म्याअधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. मोदींच्या भाषणासाठी साऊंड सिस्टीममधून आवाजदेखील इको करण्याची वेळ आली.

पुण्यातील रेस कोर्स मैदानावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. पुणे शहराबरोबरच बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकांना आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. भाजपने ही सभा दोन लाख लोकांची होईल, असे जाहीर केले होते. त्यासाठी बसेस भरून आणण्यात आल्या. परंतु जेमतेम लोकदेखील जमू शकली नाहीत.

मोदींच्या सभेला दोन लाख जण उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात खुर्च्यांची व्यवस्था 75 ते 80 हजार जणांची होती. मात्र या खुर्च्यादेखील पूर्णपणे भरू शकल्या नाहीत. प्रत्यक्षात मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हादेखील मागील भागात अनेक रॅकमधील खुर्च्या रिकाम्या होत्या.

‘साऊंड इको’ची गरज नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच साऊंड इको करण्यात आला. त्याबद्दलची तक्रार सभेतील उपस्थितांनी केली. त्याची दखल दस्तुरखुद्द मोदी यांना घ्यावी लागली. शेवटी त्यांना भाषणात सांगावे लागले की माझ्यासाठी साऊंड इको करण्याची गरज नाही.