
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंजाबनंतर आता दिल्लीत हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्लीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी घुसल्याचा संशय असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा दोन संशयित दहशतवाद्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये दिसत असलेले दहशतवादी 25 ते 30 वयाचे आहेत. तसेच त्यांचे हे फोटो पाकिस्तानच्या लगत असलेल्या सीमाभागात दिसले तेव्हाचे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हे दहशतवादी दिल्लीच्या पहाडगंज परिसरात लपल्याची शक्यता आहे. हा परिसर अतीशच गजबजलेला असून जवळच नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल्स, गेस्ट हाऊस तसेच वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. तसेच संशयितांविषयी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसाना संपर्क करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


























































