भाजपमध्ये हुकूमशाही, हिमाचल प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हिमाचल प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांच्या नावे फेसबुकवर पोस्ट केला आहे.

भाजपमध्ये हुकूमशाही सुरू आहे. आता हे फार काळ सहन करू शकत नाही. आपण पक्षाचा खरा कार्यकर्ता असून यापुढेही काम करीत राहणार असल्याचे परमार यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी हे पत्र आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कांगडा जिल्हय़ातील फतेहपूर विधानसभा मतदारसंघातून परमार यांच्या जागी पक्षाने बलदेव ठाकूर यांना उमेदवारी दिली होती.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी समजावल्यानंतर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली नाही. पण प्रचारापासून दूर राहिलो. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या भवानी सिंह पठानिया यांनी बलदेव ठाकूर यांचा 5000 हून अधिक मतांनी पराभव केला. या ना त्या मार्गाने आपला अपमान झाला. यापुढे हा अपमान सहन होत नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळेच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.