
>> आसावरी जोशी [email protected]
जम्मू-कश्मीर. नितांत सुंदर, देखणी भूमी. पर्यटन हा कश्मीरचा आत्मा. गेल्या काही आठवडय़ांच्या खूप महत्त्वाच्या घडामोडीनंतर येथील पर्यटकांचा ओघ कमी होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. पर्यटकांचा कश्मीरकडे ओघ वाढला तर आहेच, शिवाय सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्र आणि पुण्यातून जात आहेत.
काही माणसं… काही ठिकाणं… काही गोष्टी मनात घर करून राहतात… त्यांना भेट देऊन अगदी खूप वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी त्या माणसांच्या… ठिकाणांच्या आठवणी पुसू म्हणता पुसल्या जात नाहीत. हाताला लागलेल्या सोनेरी वर्खागत मनास चिकटून राहतात… रेंगाळत राहतात… किंबहुना त्या रम्य आठवणी मनाच्या तळाशी अगदी जपून ठेवल्या जातात. त्या आठवणींचा सुगंध नेहमीच मनास प्रसन्नता देत राहातो. अगदी केशरागत… केशरी भूमी कश्मीर… खूप वर्षांपूर्वी कश्मीरला जाण्याचा योग आला. वैष्णोदेवीचे जम्मू ते नितांत सुंदर कश्मीर… रम्य, सुंदर आठवणींचा गोफ. कटऱयापासून सुरू झालेला हा प्रवास श्रीनगरपर्यंत येऊन थांबला. उणेपुरे 3 ते 4 दिवस. पण प्रत्येक क्षण सुंदर आणि देखणा… गेल्या 2-3 आठवडय़ांपासून कश्मीर अनेक गोष्टींनी खूप खूप ठळक झालं… पुलवामा… बालाकोटवरील आपल्या वायुदलाचे सुवर्णाक्षरांतील झळाळते शौर्य… विंग कमांडर अभिनंदनची बहादुरी… मनात सहज विचार आला. कश्मीरातील बहुसंख्यांची रोजीरोटी पर्यटन आहे… आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक पर्यटक विशेषतः मराठी पर्यटक कश्मीरला फिरायला जातात. मनात विचार आला हा पर्यटकांचा ओघ कश्मीरातील अस्थिरतेमुळे थांबेल का? पण नाही… ओघ थांबला नाहीच… उलट तो अधिकच वाढला. आज बऱ्याचजणांना परीक्षा झाल्यानंतर जम्मू-कश्मीरला भेट द्यायची आहे. अर्थात यामागे कश्मीरी स्थानिकांचे आदरातिथ्यही आहे. पुलवामा येथील दुर्घटनेनंतर विमानसेवा थांबविण्यात आली आणि बरेचसे पर्यटक अडकून पडले. या अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला कश्मीरातील स्थानिक हॉटेलचालक धावले. प्रवाशांकरिता मोफत जेवण आणि राहण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. आता पुन्हा पर्यटकांचा ओघ कश्मीरकडे वळला आहे… आणि तो वळायलाच हवा. कारण ही आपली भूमी पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमीच उत्सुक आणि तत्पर असते.
कश्मीर. पुराणातील कथेनुसार कश्मीर हे एक मोठे सरोवर होते. काश्यप ऋषींनी त्यातील पाणी उपसून ही भूमी तयार केली. म्हणून हे कश्मीर. याची उत्पत्ती इ.स. पूर्व तिसऱया शतकात सापडते. 13-14व्या शतकात मुस्लिमांचे कश्मीरात आगमन झाले. पुढे अनेक घडामोडी होऊन 26 ऑक्टोबर 1947मध्ये महाराजा हरीसिंह यांनी जम्मू-कश्मीर संस्थान स्वतंत्र हिंदुस्थानात विलीन केले.

कश्मीर म्हणजे हिमालयाचे पश्चिम टोक. हे खोरे अनेक मजली घरासारखे आहे. उंचच उंच पर्वत रांगा आणि असंख्य नद्यांनी सुफळ संपूर्ण झालेला हा प्रदेश. वैष्णोदेवीखेरीज जम्मू हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. याखेरीज अनेक ग्रामदेवता व कुलदेवतांची येथे पूजा करण्यात येते. शिव, शक्ती, कृष्ण, महावीर, भैरवनाथ, राम या दैवतांची प्रामुख्याने उपासना करण्यात येते. डोंगराळ प्रदेशात नाग व काली यांची उपासना अधिक प्रचारात आहे. शिवाय गणपती, सरस्वती यांचीही उपासना होते. येथील मुस्लीम मूळ राजपूत असल्याने त्यांच्यातही अनेक हिंदू चालीरिती पाळल्या जातात.
नद्या व सरोवरे हे कश्मीरचे वैशिष्टय़. चिनाब, रावी, झेलम, सिंधू याव्यतिरिक्त अनेक लहानमोठय़ा नद्या कश्मीरचे सौंदर्य वाढवतात. लिथर नदीच्या तिरावर वसलेले पहलगाम. नितांत सुंदर गाव. निःशब्द शांत परिसर… आणि कलकल आवाज करीत वाहणारी लिथर नदी. तिचा संथ, सुरेल स्वर मन आणि कान दोन्ही तृप्त करतो… ओलावून जातो. गुलमर्गला याच नद्या छोटय़ा छोटय़ा झऱयांच्या रूपात खेळत असतात. वाटाडय़ा आपल्याला सांगतो, दिदी यह गंगा ही है. छोटे छोटे झरनों में बहती है. पानी पीकर देखो.. खरोखरच अमृततुल्य, मधूर चव. पाणी एवढे मधूर आणि थंडगार असू शकते याचा अनुभव मी येथे प्रथम घेतला. कितीही ओंजळ भरभरून पित राहिलो तरी समाधानच होत नाही.
कश्मीरमध्ये रेशीम, लोकर, विविध लाकडी वस्तू अतिशय स्वस्त मिळतात. बासोहली चित्रशैली येथील वैशिष्टय़. विविध लोकनृत्य आणि लोकसंगीत हे जम्मूचे वैशिष्टय़. दुम्हाल हे कश्मीरचे प्रसिद्ध नृत्य आहे. चाकरी हे पारंपारिक संगीत आहे. पेटी, सारंगी, चिमटा ही लोकवाद्यं आहेत. या संगीतावर आधारीत लोककथा सांगितल्या जातात. दुम्हाल हे लोकनृत्य पुरुष सादर करतात. कुड हे लोकनृत्य लोकदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. ते फक्त रात्रीच केले जाते. सुफियाना कलम हे अभिजात संगीत कश्मीरचे. या संगीताचा स्वतःचा असा राग आहे. संतूरवर हे संगीत वाजवले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल, डोकरा ही वाद्ये वाजवली जातात.
दर बारा कोसांवर बदलणारी भाषा हे आपले वैशिष्टय़ कश्मीरनेही जपले आहे. कश्मीरात अनेक भाषा प्रचलित आहेत. खुद्द कश्मीरच्या 10-12 भाषा आहेत. कश्मीरी, पहाडी, डोग्री, गुजरी, पंजाबी, बाल्टी, पोथबारी या भाषा प्रचलित आहेत. पहाडी ही डोंगराळ प्रदेशात बोलली जाते. झेलमच्या दरीत कश्मीरी आणि सिंधू नदीच्या दरीत तिबेटी भाषा रूढ आहेत. पुलवामा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथे आकाश निळे आहे. शेतं केशरी आहेत.
ऐतिहासिक कारगिल
पर्वतारोहणासाठी प्रसिद्ध आहे. येथे मठही आहेत. कश्मीरच्या सौंदर्याचे, लोकजीवनाचे वर्णन येथे पुरे होऊच शकत नाही. अतिशय साधी, डोंगराळ माणसं. येणाऱया पर्यटकांवर त्यांचे पोट. खूप कमी किमतीत महागडय़ा शाली, रेशमी वस्त्र्ां, कश्मीरी कशिदाकारी ते विकतात. अगदी हसतमुखाने आपण देऊ त्या पैशात समाधान मानतात. गेली कित्येक वर्षे कश्मीर अस्थीर आहे. अशांत आहे. हसती खेळती बाजारपेठ… गर्दीने फुललेले रस्ते… पाहता पाहता वातावरण बदलते. आपले सतर्क लष्करी जवान त्या ठिकाणाचा ताबा सुरक्षेसाठी घेतात… आणि क्षणार्धात वातावरणाचा नूर पालटतो. आनंदाची, उत्साहाची जागा भीतीने, दहशतीने घेतलेली असते. मला माहीत आहे, या अतिसंवेदनशील, स्फोटक प्रश्नावर केवळ पोटतिडकीने आपले मत मांडण्याखेरीज सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. पण तरीही बरेचसे आपल्यासारख्या सामान्यांच्या हातीच असते. या आपल्या कश्मीरसाठी, तेथील स्थानिकांसाठी आपण तेथे भेट तर नक्कीच देऊ शकतो. जेव्हा निःशस्त्र सामान्य माणूस एकवटतो तेव्हा भेकड दहशतीला माघार घ्यावीच लागते. कारण ही एकजूट आपले देशावरील निखळ, निरपेक्ष प्रेम दाखवत असते… आपण बाकी काहीच करू शकलो नाही तरी तेथे जाऊन कश्मीरी जनतेच्या ठाम बरोबर आहोत, सोबत आहोत एवढे सहजच दाखवू शकतो.
कश्मीरची रुचकर सात्त्विक खाद्यसंस्कृती…
जम्मू-कश्मीरची खाद्यसंस्कृती खरेच आगळी आणि समृद्ध. जम्मूला जागोजागी शुद्ध वैष्णो भोजन मिळते. कांदा-लसूण विरहीत सात्त्विक, अत्यंत रुचकर, शाकाहारी भोजन. कटऱयाहून जेव्हा वैष्णोदेवीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो तेव्हा वाटेत नंदिनी लागते. श्रमपरिहारार्थ नंदिनीचा गरमागरम पनीर पकोडा आणि मातीच्या भांडय़ातून मिळणारा मसाला चहा कधीच चुकवू नये.
पनीर, दूध, दह्याचा मुबलक वापर.
पनीर पराठा, पनीर भाजी-रोटी… कशातही कांदा लसूण नाही.
जम्मूहून कश्मीरला जाताना वाटेत पीडा गाव लागते. येथील राजमा-चावल खायलाच हवा. छोटय़ा टपऱया. बाहेर चुलीवर शिजत असलेला राजमा. मोठय़ा थाळीत गरमागरम भात, राजमा आणि वरून अक्षरशः ओतलेले देसी घी. काय या अन्नाची चव वर्णावी… कश्मीरी केहवा तर जागोजागी मिळतो.
विविध स्थानिक भाज्या आणि फळं हे जम्मू-कश्मीरचे वैशिष्टय़.
वैष्णोदेवीला जाणाऱया उपवासी भाविकांच्या पोटाला ही ताजी फळंच आधार देतात. सफरचंद, अननस, द्राक्षं. भाज्याही येथे विपुल पिकतात. नवलकोल कश्मीरींची आवडती भाजी.





























































