
सामना प्रतिनिधी । नांदेड
अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी साधूसंतांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषद देशभरात ५२६ जिल्ह्यांमध्ये सभा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे नांदेडमध्ये हुंकार सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रचारक कृष्णा देशमुख आणि नांदेड शहराध्यक्ष डॉ. रवीकुमार चटलावार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अयोध्येत राम मंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरण निर्मिती सुरु आहे. याच हेतूने आपल्या नांदेड शहरात एका भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेस प्रमुख वक्ते या नात्याने मार्गदर्शन करण्यासाठी विनायक देशपांडे अखिल भारतीय संघटन मंत्री विश्व हिंदू परिषद हे उपस्थित राहणार असून अनेक साधू संत धर्मचार्य देखील सभेस आशिर्वचन देण्यासाठी उपस्थित राहतील. ही सभा शनिवार दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे हुंकार सभा आयोजित करण्यात आली आहे. नविन मोंढा मैदान येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
१ डिसेंबर रोजी नांदेड येथे हुंकार सभा होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नविन मोंढा प्रांगणात सायंकाळी पाच वाजता ही सभा होईल. या सभेला अखिल भारतीय संघटन मंत्री विश्व हिंदू परिषदेचे विनायकराव देशपांडे, श्री. ष. ब्र. १०८ डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, स.शरबजितसिंघजी निर्मले-कथाकार सचखंड गुरुव्दारा नांदेड, दत्त संस्थान कहाळा बालयोगी देवपुरी महाराज, दत्त संस्थान तुप्पा आनंद बन महाराज कोलंबीकर, जिल्हा अध्यक्ष वारकरी संप्रदाय हभप प्राचार्य सु.ग.चव्हाण, चंद्रकांत महाराज लाठकर, माधव महाराज केंद्र माळाकोळी, सौ.ताराबाई बोमनाळे किर्तनकार प्रामुख्याने उपस्थित राहतील. प्रभू श्रीराम आमच्या आस्थेचे व अस्मितेचे प्रतिक आहेत. शेकडो वर्ष झाली रामजन्मभूमीसाठी हिंदू समाज सातत्याने संघर्षरत आहे. यासाठी लाखो हिंदूंनी बलिदान दिले, पण संघर्ष थांबलेला नाही. रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर निर्माणसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल या आशेवर हिंदू समाज गेले अनेक वर्ष वाट पाहत आहे. परंतु २९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने हा विषय आमच्याकरिता प्राथमिकतेचा नाही असे म्हंटले व पुढील तारीख जानेवारीतील दिली. यामुळे हिंदू समाजाची निराशा होवून हिंदूंच्या आस्थेचा अपमान होत आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. आता आणखी वाट पाहण्याच्या मनस्थितीत हिंदू समाज राहिलेला नाही. प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर लगेच गुजरात मधील सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण झाले तोच न्याय अयोध्येच्या रामजन्मभूमीलाही मिळावा व शिघ्रातिशीघ्र भव्य राम मंदिराची निर्मिती व्हावी व सर्वपक्षीय खासदारांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा, यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या देशभरातील खासदारांच्या भेटी चालू आहेत, अशीही माहिती देशमुख व चटलावार यांनी दिली.

































































