आपल्याच वर्गमित्राकडून उकळली 5 लाखांची खंडणी, 13 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमध्ये एका 13 वर्षीय मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हैदराबादमधील बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. आरोप आहे की, एका 13 वर्षीय मुलाने आपल्याच वर्गमित्राला धमकावून त्याला घरात चोरी करण्यास भाग पाडले. नंतर आरोपी मुलाने पीडित मुलाकडून 5 लाख रुपयांची खंडणी उकळली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने आरोपी मुलाला आपल्या वडिलांच्या तिजोरीत खूप पैसे असल्याचे सांगितले. यानंतर या गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलाने पीडित मुलाकडून त्याचे वही-पुस्तके आणि इतर साहित्य हिसकावून घेतले. तसेच त्याला घरात चोरी करून आपल्याला पैसे आणून न दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. आपल्या जीवाचे काही बरेवाईट होऊ नये या भीतीने पीडित मुलाने घरात चोरी करून या 13 वर्षीय मुलाला 5 लाख रुपये आणून दिले.

यानंतर पीडित मुलाचे वडील तिजोरीतून पैसे काढत असताना त्यांना तिजोरीत पैसे कमी असल्याचे आढळले. याबाबत त्यांनी आपल्या घरच्यांना विचारणा केली. त्यानंतर पीडित मुलाने ते पैसे आपण चोरून आपल्या वर्गमित्राला दिले असल्याचे सांगितले. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांची पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने एका पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, ‘मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले की त्याच्या वर्गमित्राने शाळेत जबरदस्तीने त्याची पुस्तके काढून घेतली आणि त्याला धमकी दिली की, जर त्याला त्याच्या घरातून पैसे मिळाले तरच तो पुस्तके परत करेल. पीडित मुलाच्या वडिलांनी असाही आरोप केला आहे की, आरोपी मुलाने आपल्या मुलाला मारहाण करून पैसे न दिल्यास त्याचे नुकसान करण्याची धमकी दिली होती.’ दरम्यान, आरोपी मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत बालकल्याण विभागात पाठवण्यात आले आहे. चोरीची रोकड मुलाने मामा आणि आईला दिल्याचे देखील उघड झाले आहे.