विंगकमांडर अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्र’ने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाई दलातील प्रमुख पायलट आणि ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. दिल्लीत एका समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला अभिनंदन यांनी पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमान पाडले. वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली. पाकिस्तानच्या एफ-16 या फायटर विमानांना प्रत्युत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना याआधी शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

जम्मू कश्मीर येथील पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने बरोबर तेरा दिवसांनी पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना आकाशात हिंदुस्थानी हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाची विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले ऍमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-21 पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले.

हिंदुस्थानने सर्व बाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना मायदेशी पाठवले. 27 फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र हा शौर्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.