किरकोळ कारणावरुन खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

अत्यंत किरकोळ कारणावरुन विद्यापीठाच्या मुख्यद्वाराच्या जवळ एका ३९ वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या तीन जणांना सहावे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेसह सहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

दि.१२ मार्च २०१७ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेदरम्यान सुनील भारती, आकाश बारसे आणि ज्ञानेश्वर हंबर्डे हे तिघे विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशव्दाराच्या आत बसून दारु पीत होते. त्यावेळी बळीराम रामा गायकवाड तेथे आला आणि त्याने ज्ञानेश्वर हंबर्डेसोबत तू श्याम मराठेला चापट का मारली, असा प्रश्न विचारुन वाद केला. वादाचे स्वरुप वाढत गेले आणि रामा गायकवाडने आपल्याकडील तलवारीच्या साह्याने ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डेवर जोरदार हल्ला केला. झटापटीत त्याच्या हातातून हत्यार खाली पडल्यावर त्याला “मारुन टाक”, असे रामाने सांगताच आकाश बारसेने ते हत्यार उचलून ज्ञानेश्वरवर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरला लोकांनी शासकीय रुग्णालयात नेले. पण रक्तस्त्राव जास्त झाल्याने ज्ञानेश्वर हंबर्डे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक परशुराम मराडे, त्यांचे सहकारी पोलीस मारोती मुसळे आणि बालाजी लाडेकर यांनी तपास पूर्ण करुन सत्र न्यायालयात खटला दाखल केला.

न्यायालयात या प्रकरणी नऊ साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. उपलब्ध पुराव्याआधारे न्या. विक्रमादित्य मांडे यांनी भादंविच्या कलम ३०२ साठी जन्मठेप व पाच हजार रुपये रोख दंड, कलम ३२३ साठी एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा तिघांना ठोठावली, अशी माहिती जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.संजय लाठकर यांनी दिली.