फुले नाटय़गृहात तिसरी घंटा वाजणार

50

सामना ऑनलाईन| डोंबिवली

गेल्या दहा महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृह अखेर रसिकांच्या सेवेत सज्ज होणार आहे. सर्व सोयींनीयुक्त नाटय़गृह तयार झाले असून २०जुलै रोजी नाटय़गृहाचा पडदा उघडणार आहे. स्थानिक संस्थेचा दुपारी ‘सही ये यार’ हा पहिला नाटय़प्रयोग होणार असून रात्री साडेआठ वाजता ‘एकच प्याला’ हा प्रयोग होणार आहे.

दुरुस्तीसाठी नाटय़गृह ऑक्टोबर २०१८ पासून बंद होते. नाटय़गृह प्रदीर्घकाळ बंद राहिल्यामुळे नाटय़रसिक नाराज झाले. मात्र आता अध्ययावत ध्वनी यंत्रणा, आरामदायी आसन व्यवस्था, वातानुपूलित यंत्रणेसह नाटय़गृह रसिकांच्या सेवेत सज्ज झाले आहे. याबद्दल नाटय़ रसिक, कलाकार, नाटय़संस्था आणि निर्माते यांनी आनंद व्यक्त केला आहे. जवळपास दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २० जुलै रोजी चार वाजता पहिला प्रयोग होत आहे. स्थानिक नाटय़संस्थेच्या ‘सही ये यार’ या नाटय़प्रयोगानंतर रात्री साडेआठ वाजता ‘एकच प्याला’ प्रयोग होणार आहे.

२१ तारखेला सकाळी ११ वाजता ‘अलबत्या गलबत्या’ हा नाटकाचा प्रयोग होणार आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत तारखांचे वाटप झाले असून आता आक्टोबरपासून तीन महिन्यांचे तारीख वाटप सुरू करण्यात येणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत शाळा-महाविद्यालयाची स्नेहसंमेलने होत असतात. गेल्या वर्षी नाटय़गृह बंद असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. यंदा त्यांना आपली कला सादर करण्यासाठी नाटय़गृह मिळणार आहे. नाटय़गृह सुरू होत असल्याने शैक्षणिक संस्थांनी समाधान व्यक्त केले.

वर्धापनदिनी भरगच्च कार्यक्रम
नाटय़गृहात आधुनिक वातानुपूलित यंत्रणा बसवण्यात आली असून रसिकांची तक्रार येणार नाही. आसन व्यवस्थाही आरामदायी आहे. स्वच्छतागृहदेखील नव्याने बनवली आहेत. २८ जुलै रोजी नाटय़गृहाचा १२ वा वर्धापनदिन असून यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या