
रोहा नगर परिषदने पाणीपट्टीमध्ये अचानक तब्बल ५५ टक्क्यांची भरमसाट वाढ केली आहे. या अन्यायकारक दरवाढीविरोधात शिवसेनेने आजपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शिवसैनिकांसह नागरिकांनी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून, “वाढीव पाणीपट्टी मागे घ्या” अशी मागणी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील बहुतेक नगरपालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टीचे दर नियंत्रित आहेत. असे असताना रोहा नगर परिषद हद्दीतील नागरिकांवर आर्थिक बोजा का लादण्यात येत आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात तालुकाप्रमुख नितीन वांगे, उपतालुकाप्रमुख दुर्गेश नाडकर्णी, सचिन फुलोरे, अनिल माळी, मनोज भायातोंडकर, सुरेंद्र मोरे, रमेश विचारे, प्रीतम देशमुख, ओंकार गुरव, भारत वाकचौरे, प्रकाश वळीवकर, सागर भगत, स्नेहल काडे, श्रद्धा पोतफोडे, मनोज लोंढेकर, बाबू कडू, प्रीतम पाचंगे, प्रशांत पिंगळे, दिलीप दांडेकर, अपेंद्र सावंत, अनिकेत कोंडे, अमित कांबळे, प्रितेश पोटदार, अनिकेत भोसले, सोहम धायटवकर आदी सहभागी झाले होते.
नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा का?
शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी उपोषणस्थळी भेट देत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. खासदार सुनील तटकरे यांची गेली तीस वर्षे नगरपालिकेवर एकहाती सत्ता आहे. कोकणचे भाग्यविधाते म्हणविणाऱ्यांची पाणीपुरवठा योजना तोट्यात असल्याचा आरोप भोईर यांनी केला. नागरिकांवर हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा का टाकला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


























































