
मौजमजेसाठी समुद्रात उतरलेले सात पर्यटक भरती आल्याने बुडू लागले. मात्र किनाऱ्यावर तैनात असलेले जीव रक्षक पोलीस आणि दामिनी पथकाने समुद्रात धाव घेत जीवाची बाजी लावत या सातही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे गणपतीपुळेसारखी भयंकर दुर्घटना टळली आहे.
गणपतीपुळे येथील समुद्रात संभाजीनगर येथील आठ पर्यटक तीन दिवसांपूर्वी बुडाले, त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सागरी प्रशासनाने सर्व किनाऱ्यांवर अलर्टचा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अलिबाग येथे आलेले पर्यटक नूर मोहम्मद मेमन, रायन मेमन, अफिफ रोहे, नदिम रोहे, गफ्फार बुबरे यांच्यासह सात जण समुद्रात उतरले. त्यावेळी समुद्राला मोठी भरती आल्याने हे सर्व पर्यटक भरतीच्या वेढ्यात अडकले आणि बुडू लागले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीव रक्षक कुणाल सारंग आणि प्रथमेश सारंग यांनी समुद्राकडे धाव घेतली. तसेच बिट मार्शल, पोलीस शिपाई कणसे आणि शिंदे यांच्यासह दामिनी पथकातील महिला पोलीस शिपाई गव्हाळे, होमगार्ड सिद्धेश नाईक आणि अमरनाथ पाल यांनी धाडस व तत्परता दाखवत समुद्रात झेप घेतली आणि बुडणाऱ्या या सर्व सात पर्यटकांना सुखरूपपणे किनाऱ्यावर आणले.
नियमांचे पालन करा
भरती आणि ओहोटीच्या वेळा वारंवार सांगण्यात येऊनही त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. या अतिउत्साहामुळेच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.




























































