
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्यात 16 ठिकाणी महायुतीची सरशी झाली. 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 10 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले नागपूर – राजीव पोतदार, नांदेड- अमरनाथ राजूरकर, लातूर- बसवराज पाटील, सोलापूर- राजेंद्र राऊत, छत्रपती संभाजीनगर- सुहास शिरसाठ, सातारा-सांगली- धैर्यशील कदम, अमरावती- प्रवीण पोटे, भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, जळगाव- नंदकिशोर महाजन हे उमेदवार विजयी झाले तर परभणी- सईद खान (शिंदे गट) आणि नाशिक- गोकुळ गिते (अपक्ष) यांचा विजय झाला. चंद्रपूर- अरुण लखाणी, अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे (भाजप), रायगड- अनिकेत तटकरे, पुणे- विक्रम काकडे (अजितदादा गट), ठाणे- रवींद्र फाटक, यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे गट) हे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रत्येकी 10 लाख देऊन भाजपने मतदार पह्डले – अतुल लोंढे
नागपूर मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. कॉँग्रेसकडे स्वतःची 170 मते असताना त्यांच्या उमेदवाराला 130 मते मिळाली. यामुळे कॉँग्रेसच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने 10-10 लाख रुपये देऊन 100 मते पह्डल्याचा आरोप उमेदवार अतुल लोंढे यांनी केला आहे.




























































