खराडीतील भोंदूबाबाची ‘आरती’ अन् ‘पाद्यपूजन’, राधामोहन मिश्राचे व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो भक्तांकडून आरती करवून घेत असून, पाणी आणि दुधाने त्याचे पाय धुवून काही महिलांसह तरुणी ते प्राशन करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राधामोहन मिश्रा, स्वामी कंवल नयन याच्यासह ६ महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीच्या आई-वडिलांची भोंदू मिश्रावर श्रद्धा होती. त्याचाच गैरफायदा घेत तरुणीला मानसिकदृष्ट्या जखडून ठेवले. तिचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला. पीडितेला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडून तिची मालमत्ताही स्वतःच्या नावावर करून घेतली. भोंदू मिश्राचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये मिश्राची भक्तांकडून आरती केली जात आहे. तसेच काही महिलांसह तरुणी पाणी आणि दुधाने त्याचे पाय धुऊन प्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, १७ वर्षांच्या छळानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, मिश्रा, नयन यांच्यासह पाच महिलांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तसेच, त्यांचा अंतरिम जामीनही फेटाळून लावला आहे. आरोपींच्या जामीनाला सरकारी वकील अ‍ॅड. योगेश कदम यांनी विरोध केला होता.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका महिलेची अटक बेकायदा असल्याचा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने तिची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

भोंदू खरातची मिश्राकडून पुनरावृत्ती

नाशिकमधील भोंदू अशोक खरात यानेही अशाच पद्धतीने महिलांना वश करीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्याची पाद्यपूजा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याप्रमाणे भोंदू राधामोहन मिश्रा यानेही भक्तांकडून पाय धुवून ते प्राशन करण्यास भाग पाडले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भोंदू मिश्रा खाटेवर आडवा पसरला असून, भक्त त्याची पाद्यपूजा केल्यानंतर त्याच्या नावाची आरती करताना दिसत आहेत.