
खडवलीजवळील भातसा नदीपात्रात डुबक्या मारण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. पर्यटकांच्या नांगावली हुल्लडबाजी होऊन अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेहरे-खडवली ग्रुप ग्रामपंचायत आणि मांडा-टिटवाळा पोलिसांनी नदी परिसरात निर्बंध लागू केले आहेत. खडवलीच्या नदीत आंघोळीला उतरला तर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला आहे.
शनिवार आणि रविवारसह सुटीच्या दिवशी नदी परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकदा मद्यपान, धूम्रपान तसेच इतर अनुचित प्रकारही घडत असतात. नदीपात्रातील पाण्याची खोली लक्षात न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यटकांकडून रस्त्यालगत व नदीकाठी अनियंत्रितपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूककोंडीचे प्रश्न निर्माण होतात. तसेच काहीवेळा पर्यटकांच्या गटांमध्ये हाणामाऱ्याही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने नदीपात्रात आंघोळ, मद्यपान व धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
४० गावांना पाणीपुरवठा
कल्याण तालुक्यातील खडवली गावाजवळून वाहणारी भातसा नदी बारमाही असून तिचे पाणी स्वच्छ आहे. याच नदीचे पाणी परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावांमधील नागरिकांना नळयोजनेद्वारे पुरवले जाते. पाणी दूषित होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली असून नदीपात्रात दाखल पाट्यांनी निर्बंध घातले आहेत.




























































