
शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करू, असे आश्वासन महायुती सरकारने पंढरपुरात विठुरायाच्या साक्षीने दिले होते. मात्र ते पूर्ण न करून शेतकऱयांचा विश्वासघात केला आहे. त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असे सांगतानाच, सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून रोहित पवार यांनी 30 जूनपर्यंत विधिमंडळ अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे. तसे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.
शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये जाचक अटी घालून 44 लाख शेतकऱयांवर अन्याय केला जात आहे. त्या अटी दूर करा, अशा मागणीसाठी रोहित पवार यांनी 26 शेतकऱयांसह पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली होती. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र बैठक न बोलवून सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
29 जून रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको
आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने मी फक्त सही करण्यासाठी आलो आहे. उद्यापासून 30 जूनपर्यंत मी अधिवेशनात येणार नाही. या काळात मी मराठवाडा आणि इतर जिह्यांमध्ये जाऊन शेतकऱयांशी थेट संवाद साधणार आहे. तसेच, येत्या 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठे ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहोत. या विश्वासघाती सरकारला आम्ही सोडणार नाही.




























































