नवी मुंबई पालिकेत सत्ताधारी-प्रशासनात जुंपली, एनएमएमटी व्यवस्थापकांना दालनात जाण्यापासून रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरातील महापालिकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांचा संघर्ष पाहायला मिळत असला तरी नवी मुंबई महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजप आणि प्रशासनात जोरदार जुंपली आहे. एनएमएमटीचे तत्कालीन महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांची बदली झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी त्यांच्या जागेवर उपायुक्त भागवत डोंईफोडे यांना पाठवले. मात्र भाजपच्या श्रमिक सेनेने डोंईफोडे यांना एनएमएमटी महाव्यवस्थापकांच्या दालनात जाऊ दिले नाही. डोंईफोडे यांच्या ऐवजी महाव्यवस्थापकांच्या खुर्चीवर तुर्भे बस आगाराचे व्यवस्थापक उमाकांत जंगले यांना बसवले.

नवी मुंबई महापालिकेची नवीन महासभा अस्तित्वात आल्यापासून सभागृह नेते सागर नाईक यांनी अनेक बदल केले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अधिकारांवर गदा आली असल्याने सत्ताधारी आणि प्रशासन असा संघर्ष पालिकेत पाहायला मिळत आहे. महासभेत शिंदे गट आणि भाजप यांच्यात खटके उडत असतानाच आता हे लोक थेट प्रशासनापर्यंत येऊन पोहोचले आहेत.

एनएमएमटीचे तत्कालीन महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपायुक्त भागवत डोंईफोडे यांना पाठवले. डोंईफोडे पदभार स्वीकारण्यासाठी गेले असता भाजपच्या श्रमिक सेनेने त्यांना महाव्यवस्थापकांच्या दालनाच्या बाहेर रोखले. त्यांना खुर्चीवर बसू दिले नाही. परिवहन समितीने या पदावर परस्पर तुर्भे बस आगाराचे व्यवस्थापक उमाकांत जंगले यांना बसवले आहे. आयुक्तांनी महाव्यवस्थापकांचा पदभार डोंईफोडे यांना दिलेला असताना त्या खुर्चीवर मात्र जंगले विराजमान झाले आहेत. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महासभेत आयुक्तांना लक्ष्य
एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर पडल्याने पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईत पाणी कपातीची घोषणा केली. हा प्रकार सत्ताधारी भाजपच्या जिव्हारी लागला आहे. आयुक्तांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार नाही, हा मुद्दा महासभेत उपस्थित करून आयुक्तांना लक्ष्य करण्यात आले.