
तळ्याच्या भानंगमधील ५ लाख रुपयांचा रस्ताच चोरीला गेला आहे. हे ऐकून आश्चर्य जरी वाटले तरी ते खरे आहे. बौद्धवाडी ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याच्या कामासाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने रस्त्याचे काम न करताच ते पूर्ण झाल्याचा बनावट फलक लावला आहे. ठेकेदाराच्या या बनवाबनवीची परिसरात खमंग चर्चा सुरू असून या झोलबाबत नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील तळे तालुक्यातील भानंग येथील बौद्धवाडी ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जनसुविधा योजनेंतर्गत ५ लाख रुपये मंजूर करण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने प्रत्यक्षात कोणतेही काम न करता केवळ बनावट माहितीचा फलक उभारून निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणात संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून मंजूर निधीचा वापर नेमका कुठे आणि कसा करण्यात आला याची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अपहार झालेला निधी वसूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठेकेदाराची बनवाबनवी; चौकशीचे आदेश
पंचायत समिती प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊन निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्याचे सांगितले आहे. तक्रारीची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनील गायकवाड यांनी सांगितले.

























































