दफनविधीनंतर शब्बीर जिवंत परतला! व्हॉट्सअ‍ॅपवरील फोटोने पटली ओळख, दफन केलेला मृतदेह कुणाचा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्याचा दफनविधी झाला, तोच काही दिवसांनी जिवंत घरी परतला… हे ऐकणाऱ्याला हे चित्रपटातील कथानक वाटेल. मात्र, राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे ही धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना घडली. शब्बीर जमादार मन्सुरी या मतिमंद व्यक्तीला मृत समजून कुटुंबीयांनी अंत्यविधी पार पाडले; पण काही दिवसांनी तोच जिवंत सापडल्याने मृतदेह ओळख प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मानसिक स्थिती सामान्य नसलेला शब्बीर काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. दोन दिवस प्रयत्न करूनही तो न सापडल्याने हरवल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. दरम्यान, जोर्वे परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहिती आणि बाह्य वर्णनावरून तो मृतदेह शब्बीरचाच असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. नातेवाईकांना बोलावून ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि दफनविधीही करण्यात आला.

घरातील सदस्यांना शब्बीरला कायमचे गमावल्याचे दुःख होते. मात्र, नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. काही दिवसांनी अहिल्यानगरच्या एका भागात एका शेतकऱ्याला भुकेने व्याकूळ झालेला भरकटलेला एकजण दिसला. त्याला खायला देऊन त्याच्याशी संवाद साधला असता त्याने स्वतःचे नाव शब्बीर आणि आपण सोनगाव येथील असल्याचे सांगितले. शेतकऱ्याने त्याचा फोटो व्हॉट्सअॅप समूहांवर पाठविला. समूहांमधून हा फोटो सोनगावपर्यंत पोहोचला आणि फोटो पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. व्हिडीओ कॉल केल्यानंतर तो शब्बीरचे असल्याची खात्री झाल्यामुळे कुटुंबीय अहिल्यानगर येथे गेले आणि शब्बीरला सुखरूप घरी घेऊन आले.

या घटनेने कुटुंबात आनंद व्यक्त होत असतानाच प्रशासनासमोर अनेक गंभीर प्रश्नही आता निर्माण झाले आहेत. शब्बीरचा समजून जो मृतदेह दफन करण्यात आला, तो कोणाचा होता? त्या मृतदेहाची ओळख पटविताना नेमकी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली आणि अशी गंभीर चूक कशी घडली, याची माहिती आता प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर दफन करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीची खरी ओळख अजूनही पटलेली नाही. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हानही प्रशासनासमोर उभे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपासातून काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.