सोने खरेदी करू नका सांगणारे खासदार खरेदी करतात! काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला सल्ले देतात. सोने-चांदी आणि दागिने खरेदी करू नका असे सांगतात, पण स्वतः आमदार आणि खासदार खरेदी करतात,’ असा सणसणीत टोला काँग्रेसचे खासदार पवन खेरा यांनी केला.

तृणमूल काँग्रेसनंतर सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचे खासदार फोडले आहेत. त्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या सौदेबाजीला ‘ऑपरेशन टायगर’ नाव देण्यात आले होते. त्यावर पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हे ऑपरेशन टायगर किंवा कमळ नसून ऑपरेशन चिखल आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून येऊ शकले नाहीत, तिथे भाजप अशा पद्धतीने चिखल करत आहे’, अशी टीका खेरा यांनी केली.

मोदींचा अहंकार दुखावलाय!

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला होता. मात्र त्यांना जेमतेम 240 खासदार निवडून आणता आले. त्यामुळे ते दुखावले गेले आहेत. त्यातूनच ही आमदार, खासदारांची चोरी सुरू आहे. आधी तृणमूलचे खासदार-आमदार चोरले. आता शिवसेनेचे चोरले. या दरोडय़ामागचा उद्देश देशाचे संविधान बदलणे हाच आहे,’ असा आरोप खेरा यांनी केला.