
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदारांची फोडाफोडी आणि गैरकारभारावरून विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. भाजपला देशात दंगे करता येतात, चांगला प्रचार करता येतो, वेगळे वातावरण निर्माण करून गदारोळ करता येतो, भेदाभेद करून लोकांची मने वळवता येतात, पण सरकार चालवता येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईतील पाणीकपातीबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच पाण्याची कपात केली गेली. 10 टक्के कपात सांगून जास्तच कपात होतेय. येतेय तेसुद्धा गढूळ पाणी. मुंबई कधीच अशी चालत नव्हती. पाणीच नव्हे तर विजेचीही कपात सुरू आहे. बेस्टचे पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेय. पुण्यात तर आलटून पालटून पाणी येतेय. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. याकडे भाजपचे लक्ष नाही. ते फक्त लोकांचे पक्ष आणि घरे कशी फोडायची यावर लक्ष केंद्रित करून आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेनेने त्यांना प्रेमच दिले, त्यांनी सौदा केला
खासदार ओम निंबाळकर यांच्याबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, निंबाळकर यांना शिवसेनेने नेहमी प्रेमच दिले. शिवसेना परिवार म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी अशा पद्धतीने स्वतःचा आणि परिवाराचा सौदा करणे दुःखद आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
संविधान बदलण्यासाठी खासदार फोडले जाताहेत
संविधान बदलण्यासाठी भाजपकडून खासदार फोडले जात आहेत. जनतेच्या पैशांतून ही फोडाफोडी सुरू आहे. या देशात न्यायप्रक्रिया असेल तर ती या गद्दार खासदारांना नक्कीच अपात्र ठरवेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ये तो सिर्फ ट्रेलर है…
नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अनपेक्षित पराभव केला. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी दाढीवर हात फिरवत ‘ये तो सिर्फ ट्रेलर हैं…’ असा मिश्किल टोला शिंदे यांना हाणला.
निधी मिळत नसल्याच्या फुटीर खासदारांच्या दाव्याचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. निधी तर आम्हालाही मिळत नाही. निधी देताना आमच्याशीही भेदभाव केला जातो. पण शिवसेनेतून जे गेले ते निधीसाठी नाही तर स्वतःच्या खिशासाठी सौदा करून पळून गेले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गद्दारांचे कोणते ऑपरेशन करायचे ते जनताच ठरवेल
शिवसेनेतून फुटलेले खासदार एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, शिवसेना एकच आहे आणि ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते, दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत आणि बिकाऊ लोक तिकडे चालले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 85 लाख लाडक्या बहिणींना सरकारने योजनेतून बाहेर काढले. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे. बेस्टसाठी पैसे नाहीत. विकाऊ, नालायकांना विकत घ्यायला सरकारकडे पैसे आहेत. शिवसेनेला धोका देणाऱ्या गद्दारांचे कोणते ऑपरेशन करायचे ते जनताच ठरवेल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.





























































