
पिढ्यान्पिढ्या भाजपमध्ये काम करणाऱ्यांची सद्दी आता संपली आहे. अगदी कॉलेजच्या ‘सीआर’ पासून बचत गटाच्या अध्यक्षापर्यंत सर्वत्र भाजपचाच बोलबाला आहे. पण निवडून येणारे उमेदवार बघितले तर नाव भाजपचे आणि वंशावळ मात्र काँग्रेसची असे विदारक चित्र समोर येते. मराठवाड्यातील चार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघापैकी तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत, पण त्यांचे ‘मूळ’ काँग्रेसचे आहे. एक उमेदवार निवडून आला तो मिंधे गटाचा!
नुकतीच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर-जालना, नांदेड, हिंगोली-परभणी आणि लातूर-बीड-धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली. सुहास शिरसाठ, अमर राजूरकर, सईद खान आणि बसवराज पाटील हे चौघे निवडून आले. यापैकी शिरसाठ, राजूरकर आणि पाटील हे भाजपचे तर सईद खान हे मिंधे गटाचे आहेत. निवडून आलेले उमेदवार भाजपचे असले तरी त्यांचे ‘कुळ’ मात्र काँग्रेसचे आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून निवडून आलेले सुहास शिरसाठ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक होते. पुढे सारीपाटावरच्या सोंगट्या बदलल्या आणि शिरसाठ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा केला. किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर या ‘ओरिजनल’ भाजपाईंच्या निष्ठा मातीमोल ठरवून शिरसाठ यांना मैदानात उतरवण्यात आले.
नांदेडातून निवडून आलेले अमर राजूरकर यांची सगळी राजकीय हयात काँग्रेसमध्ये गेली. राजूरकर हे काँग्रेसी असले तरी त्यांची निष्ठा अशोक चव्हाणांशी ! अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये ‘आदर्श’ प्रवेश झाला. चव्हाणांचा हात धरून राजूरकरही निवडून भाजपमध्ये आले. नांदेडातील अस्सल निष्ठावंतांना सतरंज्या उचलण्याचे काम देऊन चव्हाणांनी राजूरकरांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नाहीतर याच निष्ठावंताना राजुरकरांना आणण्याच्या कामी जुंपण्यात आले.
लातूर-बीड-धाराशिव
मतदारसंघातून निवडून आलेले बसवराज पाटील यांची सगळी हयात काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसच्या कारकिर्दीत ते मंत्रीही झाले होते. अलिकडे अडगळीत पडलेल्या बसवराज पाटलांना भाजपने ‘कमळवस्त्र’ घातले. पाटील भाजपमध्ये आले आणि भाजपच्या दिग्गजांना बाजूला सारून त्यांनी तिकिटही मिळवले. काँग्रेस कार्यकर्त्यांशीही फटकून वागणारे बसवराज पाटील यांचे भाजप कार्यकर्त्यांशीही फारसे सख्य नाही. परंतु पाटलांना निवडून आणण्यासाठी भाजपने निष्ठावंतांना अक्षरशः घरगडीच बनवले.
परभणी-हिंगोलीत मिंध्यांनी सईद खान यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. आनंद भरोसे यांचा भरवसा तोडून सईद खान मैदानात उतरले. या सईद खान यांचा राजकीय प्रवास गंमतीदार आहे. सईद खान हे भावना गवळी यांचे कार्यकर्ते. ‘ईडी’च्या जाचामुळे गवळी यांच्या ‘भावना’ दुखावल्या. चौकशी, अटका वगैरे टाळण्यासाठी त्या मिंधे गटात आल्या. त्या पाठोपाठ सईद खानही मिंधे गटात आले आणि आता थेट आमदार झाले. सईद खान यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे निष्ठावंत मानेवर जू ठेवून काम करत होते.
अस्सल, जातीवंत भाजप कार्यकर्ता आहे कुठे?
उठसुठ काँग्रेसला दूषण देण्याचा रोगच भाजपला जडला आहे. मात्र उपऱ्या काँग्रेसीनीच आता भाजप व्यापली आहे. ज्यांची हयात भाजपमध्ये सतरंज्या उचलण्यात गेली त्यांना उपेक्षित ठेवून भाजपने ‘मालदार’ काँग्रेसींना विधान परिषदेवर पाठवण्याचे ‘संघ’ कार्य केले आहे, अशा प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटत आहेत.





























































