
ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांच्या गटाने पक्षावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या गटाने पक्षाच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांनाच अध्यक्षपदावरून हटवले आहे. तसेच, खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित केले आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक आमदार व खासदार तृणमूलमधून बाहेर पडले. खासदारांनी स्वतःचा गट त्रिपुरातील एनसीपीआय पक्षात विलीन केला. तर, ऋतब्रत यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाने मूळ पक्षावर दावा केला होता. आज या गटाने परस्पर पक्ष संघटनेत बदलाची घोषणा केली. ममतांना अध्यक्षपदावरून हटवून अरुप रॉय यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा केली. तर, अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून काढून टाकले.
पक्षाच्या घटनेनुसार बदलाचा दावा
पक्षाच्या घटनेनुसार प्रत्येक तीन वर्षांनी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. मागील कार्यकारिणी फेब्रुवारी 2022 मध्ये घोषित करण्यात आली होती. तिची मुदत मागील वर्षीच संपली होती. मात्र नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली नव्हती. त्यामुळे घटनेनुसारच आम्ही हे बदल केले आहेत, असे ऋतब्रत यांनी सांगितले.
कोलकात्याच्या महापौरांनीही ममतांची साथ सोडली!
ममता बॅनर्जी यांना आज आणखी मोठा धक्का बसला. आमदार, खासदारांनंतर आता कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी ममतांची साथ सोडली आहे. त्यांनी फुटीर गटात प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. कोलकात्याच्या न्यू टाऊनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फुटीर गटाने आयोजित केलेल्या बैठकीला हकीम यांनी हजेरी लावली. या बैठकीला आमदार, नगरसेवक व विविध जिह्यांतील तृणमूलचे 500 हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते.





























































