
धरणांनी तळ गाठल्यामुळे पाणीकपातीच्या संकटाला तोंड देत असलेल्या मुंबईकरांना पाऊस नुसतीच हूल देऊ लागला आहे. रविवारपाठोपाठ सोमवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. मात्र काही मिनिटांत त्याने दडी मारली. ढगांचा गडगडाट झाल्याने मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण अपेक्षेनुसार पाऊस पडलाच नाही. त्यामुळे सलग दुसऱया दिवशी ‘हिरमोड’ झाला.
जून संपत आला तरी मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही. उलट शहरात उकाडय़ात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सकाळी पावसाने चांगली हजेरी लावली होती. पण तो काही मिनिटेच कोसळून गायब झाला. सोमवारी पुन्हा सकाळच्या सुमारास ढगांचा जोराने गडगडाट झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. मात्र रविवारचाच कित्ता गिरवत पुन्हा हूल दिली.
नवा अंदाज… मान्सून 48 तासांत मुंबईत!
हवामान खात्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत सोमवारी नवीन अंदाज वर्तवला. पुढील 48 तासांत नैऋत्य मोसमी वारे मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे नमूद केले.





























































