‘हिंदुस्थानला महाशक्ती बनण्याची गरज नाही, कारण…’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21व्या शतकामध्ये हिंदुस्थान महाशक्ती बनणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच हिंदुस्थानला महाशक्ती बनवू शकता असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असताना या संदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. हिंदुस्थानला महाशक्ती बनण्याची गरज नसल्याचे मोहन भागवत म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत रविवारी बिहारमधील सारण जिल्ह्यातील मलखाचक गावात गेले होते. येथे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांनी सन्माम केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुमार लिखित पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जगभरातील लोक बोलत आहे की हिंदुस्थान महाशक्ती बनणार आहे. परंतु माझे मत विचाराल तर हिंदुस्थानला महाशक्ती बनण्याची कोणताही गरज नाही, कारण जो देश महाशक्ती बनलाय त्याने कायम दुसऱ्या देशांवर लाठी चालवण्याचे काम केले होते. इतर कोणताही पराक्रम केलेला नाही, असे स्पष्ट मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आधी रशिया दुसऱ्या देशांवर लाठी चालवायचा, आता अमेरिका चालवतोय. चीनलाही असे करण्याची इच्छा आहे. तसेच आज युक्रेनच्या भूमीवर अमेरिका आणि रशियात युद्ध सुरूय, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याआधीही त्यांनी असेच एक विधान केले होते. मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हिंदुस्थानला जगातील महाशक्तीचनव्हे तर विश्वगुरुच बनवायचे आहे, असा निर्धार व्यक्त केला होता.