
यूएईमध्ये झालेला आयसीसीचा टी-20 वर्ल्डकप संपताच टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. विराट कोहलीने कर्णधारपद आणि रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर आता संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड झाली आहे. रोहित आणि राहुलच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियामध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. या जोडीची पहिली मालिका उद्यापासून न्यूझीलंडविरुद्घ होणार आहे. मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी दोघांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान टीम इंडियामध्ये आता विराट कोहलीची भूमिका नक्की काय असेल याबाबत रोहितने खुलासा केला.
पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियात विराट कोहली याची फलंदाजा व्यतिरिक्त काय भूमिका असेल असा प्रश्न विचारण्यात आला. रोहित शर्मा म्हणाला की, विराट याआधी जे करत आलाय तोच रोल त्याचा पुढेही राहील. टीम इंडियाच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर विराट खूप मोठा खेळाडू आहे आणि संघात प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते. विराट जेव्हा पुनरागन करेन तेव्हा त्याचा संघाला फायदाच होणार आहे, असेही रोहित म्हणाला.
क्रीडाप्रेमींना मेजवानी, हिंदुस्थानकडे दोन वर्ल्डकप अन् एका चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
कधी करणार पुनरागमन?
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली याचा विश्रांती देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीतही त्याला आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. ही कसोटी झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत विराट कोहली संघात पुनरागमन करेन.
द्रविड काय म्हणाला?
राहुल द्रविड म्हणाला की, वर्क लोडचे व्यवस्थापन करणे मोठे आव्हान आहे. तो आता क्रिकेटचा एक भागच झाला आहे. हे आव्हान फक्त आपल्यालाच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या इतर देशांपुढेही आहे. त्यामुळे न्यूझीलंडने केन विलियम्सनला टी-20 मालिकेत विश्रांती दिली. तसेच यापासून वाचण्यासाठी नवीन रणनिती बनवण्यात येईल. खेळाडू काही मशीन नाहीत, त्यामुळे प्रत्येक फॉर्मेटप्रमाणे काही खेळाडूंमध्ये बदल होऊ शकतो, असेही तो म्हणाला.




























































