India vs Australia ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 2-1 ने जिंकणार, दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ कसून सराव करत असतानाच श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटून महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने एक भविष्यवाणी केली आहे. हिंदुस्थानात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकाने जिंकेल असे जयवर्धने याने म्हटले आहे.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दोन स्थानावर आहे. यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी दोन्ही संघ आघाडीवर आहेत. त्यामुळे दोन्ही संघात तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ जवळपास गेल्या 20 वर्षात हिंदुस्थानात कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. 2004मध्ये ऑस्ट्रेलिया हिंदुस्थानचा 2-1 असा पराभव केला होता.

दरम्यान, या मालिकेबाबत बोलताना महेला जयवर्धनेने एक भविष्यवाणी केली आहे. बॉर्डर-गावसकर मालिका रोमांचक असणार आहे, परंतु या मालिकेचा विजेता कोण होईल हे सांगणे कठीण आहे. माझ्या मते ऑस्ट्रेलिया ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकेल. अर्थात त्यांच्यासाठी हे सोपे असणार नाही. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. अशा स्थितीमध्ये ज्या संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करतील त्यांच्या बाजून मालिकेचा निकाल अपेक्षित आहे, असे जयवर्धने म्हणाला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही डिवचले

दरम्यान, बॉर्डर–गावसकर ट्रॉफीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक ट्विट करत टीम इंडियाला डिवचले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेमध्ये हिंदुस्थानचा संघ एडलेडच्या मैदानावर अवघ्या 36 धावांमध्ये बाद झाला होता. याचा व्हिडीओ शेअर करत बॉर्डर–गावसकर ट्रॉफी गुरुवारपासून सुरू होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

कसोटी क्रमवारीसाठी चुरस

हिंदुस्थानने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करत बॉर्डर–गावसकर ट्रॉफी पटकावली होती. याचबरोबर कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठीसुद्धा ही मालिका उभय संघांना महत्त्वाची ठरणार आहे. सध्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून हिंदुस्थान दुऱ्या स्थानावर आहे.

बॉर्डर–गावसकर ट्रॉफी कार्यक्रम

– पहिली कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
– दुसरी कसोटी 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
– तिसरी कसोटी 1 ते 5 मार्च (धरमशाला)
– चौथी कसोटी 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)