
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील तिसरा वन डे सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरण) राहून आंतरराष्ट्रीय मालिका खेळणे सोपे नव्हे असेही त्याने बोलून दाखवले. विराट कोहलीच्या या वक्तव्याची बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच आर्थिक गणित जुळण्यासाठी यापुढे प्रत्येक मालिकांमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी बीसीसीआय दबाव टाकू शकणार नाहीत. शिवाय अति क्रिकेट खेळून शारीरिक व मानसिकरीत्या खेळाडू थकले असतील तर त्यांना मालिकेमधून माघार घेण्याची मुभाही देण्यात येईल अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.
बेंच स्ट्रेंथ भक्कम
बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, कोरोनामुळे यंदाचा मोसमातील क्रिकेट दौऱयांमध्ये फरक पडला. तसेच परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात. सध्या टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ (बेंचवरील खेळाडू) भक्कम आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूला विश्रांतीची गरज असल्यास सुट्टी दिली जाते.
नॉन स्टॉप क्रिकेट
हिंदुस्थानच्या संघाला 2021 ते 2023 सालामध्ये प्रचंड क्रिकेट खेळायचे आहे. या वर्षी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना आयपीएल, जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, इंग्लंड दौरा, टी-20 वर्ल्ड कप, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळावयाचे आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंना अधूनमधून विश्रांती मिळणे गरजेचे असणार आहे.
स्थानिक स्पर्धांना मदत होतेय
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करता येणार नाही असे सूत्रांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. यावेळी ते म्हणाले, आयपीएलमुळे बीसीसीआयला आर्थिक नफा होतो. त्यामुळेच स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. यामुळेच आयपीएलच्या वेळापत्रकाला हलवता येणार नाही.
आयपीएलला विरोध का नाही?
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी व्यस्त आंतरराष्ट्रीय मालिकांबाबत तक्रार केली. यावर बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, हे खेळाडू आयपीएलमधून माघार घेत आहेत का? ते या स्पर्धेबाबत तक्रार करीत आहेत का? याचे उत्तर आहे नाही. बीसीसीआयचे पदाधिकारी या प्रकरणावरून नाराज असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.




























































