कोलकात्यापुढे दिल्लीने गुडघे टेकले

वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थीच्या माऱयापुढे दिल्लीने 153 धावांत गुडघे टेकल्यामुळे कोलकात्याने विजयी लक्ष्य 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 21 चेंडू आधीच गाठले. ईडन गार्डन्सवरील चौथ्या आणि आयपीएलमधील सहाव्या विजयामुळे कोलकात्याने 12 गुणांसह तालिकेत दुसरे स्थान संपादले असून प्ले ऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा अधिक बळकट केल्या आहेत.

आज कोलकात्याच्या माऱयापुढे दिल्लीचा एकही आघाडीवीर उभा राहिला नाही. पृथ्वी शॉ (13) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क जोरदार सलामी देण्यात अपयशी ठरल्यानंतर दिल्लीचा एकही फलंदाज जोरदार खेळ करू शकला नाही. वरुण चक्रवर्थीने दिल्लीची मधली फळी कापून काढत 16 धावांत 3 विकेट टिपल्यामुळे  7 बाद 101 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर कुलदीप यादवने शेवटपर्यंत किल्ला लढवत दिल्लीला 9 बाद 153 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. कुलदीपने 26 चेंडूंत नाबाद 35 धावा केल्या. दिल्लीच्या 154 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टच्या 33 चेंडूंतील 68 धावांच्या झंझावाताने सामन्यातील सारी हवाच काढून टाकली. सॉल्टने सुनील नारायणसह 79 धावांची सलामी दिली. पण नारायण 15 धावाच करू शकला. दोघे सलामीवीर बाद झाल्यानंतर रिंकू सिंगही (11) लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर(33) आणि वेंकटेश अय्यरने (26) 57 धावांची नाबाद भागी रचत कोलकात्याला सहजसुंदर विजय मिळवून दिला.