नागपुरातून आयएसआयच्या एजंटला पाकिस्तानी नागरिकासोबत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नागपूर

नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अँटी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा  एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक केली.आणखी एक दुसरा एजंट आणि तीन अन्य पाकिस्तानी नागरिकांचा तपास सुरु असून त्यांनाही ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे.

नागपूरसह देशातील काही भागांमध्ये पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीचे एजंट सक्रिय असल्याची माहिती मिलिट्री इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार एजंटांवर पाळत ठेवली जात होती. मिलिट्री इंटेलिजन्स आणि एटीसी मिळून हे काम करीत होते. या दरम्यान मिळालेल्या गंभीर माहितीनुसार देशातील चार ठिकाणी धाड टाकण्याची योजना बनवण्यात आली. नागपूर शिवाय पंजाब, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि रायबरेली येथे एजंट लपून बसले होते.

शुक्रवारी दुपारी गणेशपेठ बस स्टँडजवळील एका इमारतीवर धाड टाकली असता त्यांना एक पाकिस्तानी एजंट घटनास्थळीच सापडला. पकडण्यात आलेला एजंट मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. याशिवाय नांदेड येथे राहणारा एक एजंट आणि तीन इतर पाकिस्तानी नागरिकांचाही चमू शोध घेत आहे.

गेल्या महिन्यातच ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला लिक करणाऱ्या वरिष्ठ अभियंता निशांत अगरवाल याला उत्तर प्रदेश एटीएस आणि मिलिट्री इंटेलिजन्सच्या पथकाने अटक केली होती. निशांत हा पाकिस्तानने फेसबुकवर लावलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये सापडल्याचे पुरावेही तपास यंत्रणांना सापडले होते. आज करण्यात आलेली अटक ही याच प्रकरणातील तपासाच्या आधारे झालेली कारवाई असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकड्यांच्या हनी ट्रॅपमध्ये फसला अभियंता, ब्राह्मोसची खबर लिक