
अमेरिका आणि इराण यांनी शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून, ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ (इस्लामाबाद एमओयू) असे नाव असलेल्या या करारामुळे पाकिस्तानची नव्याने निर्माण झालेली प्रादेशिक प्रतिष्ठा आणि जागतिक प्रभाव दिसून येतो, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला एक ‘जोरदार धक्का’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले की, अमेरिका आणि इराणमधील १४ मुद्द्यांचा इस्लामाबाद सामंजस्य करार आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.
‘या कराराला ‘इस्लामाबाद एमओयू’ असे म्हटले जाणे यामधून पाकिस्तानची नवी ओळख आणि जागतिक प्रभाव दिसत’, असे रमेश यांनी ‘एक्स’ वर म्हटले. तसेच हा तोच पाकिस्तान आहे ज्या पाकिस्तानला नोव्हेंबर २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक स्तरावर एकटे पाडले होते, असेही जयराम रमेश यांनी नमूद केले आहे.
अमेरिका और ईरान के बीच 14 सूत्री इस्लामाबाद समझौता ज्ञापन अब आधिकारिक रूप से जारी कर दिया गया है।
1. सच यह है कि इसे इस्लामाबाद MOU कहा जा रहा है, जो पाकिस्तान की नई क्षेत्रीय हैसियत और वैश्विक प्रभाव को दिखाता है। यह वही पाकिस्तान है, जिसे नवंबर 2008 के मुंबई आतंकी हमलों के बाद…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 18, 2026
‘पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाच्या पद्धतीला लागलेला हा एक मोठा धक्का आहे. पाकिस्तान आता पश्चिम आशियाच्या भू-राजकीय आणि सुरक्षा रचनेत अधिक मजबूत झाला आहे, ज्याचे हिंदुस्थानसाठी अत्यंत गंभीर आणि मोठे परिणाम होतील’, असा इशारा जयराम रमेश यांनी दिला आहे.
हा सामंजस्य करार टिकला, तर ती एक मोठी प्रगती मानली जाईल. परंतु या दोन्ही बाजूंकडून हा करार एका ‘मेमोरँडम ऑफ मिसअंडरस्टँडिंग’मध्ये बदलण्याचीही शक्यता आहे. सध्याच्या घडीला एवढेच सांगता येईल की, पुढील ६० दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, असेही ते म्हणाले.
जयराम रमेश यांनी सांगितले की, इराणने आपला प्रतिकार आणि लढाऊ वृत्ती दाखवून दिली आणि त्यामुळेच सामंजस्य करारातून स्वतः इराणला खूप महत्त्वाचे आणि अगदी अनपेक्षित फायदे झाले आहेत, असाही दावा त्यांनी केला.
‘हा सामंजस्य करार इस्रायलच्या पंतप्रधानांचा निश्चित पराभव आहे. ते अजूनही वेगवेगळ्या मार्गांनी यामध्ये खोडा घालू शकतात. बेंजामिन नेतन्याहू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आहेत आणि अध्यक्ष ट्रम्प यांनीही त्यांच्याबद्दलचा आपला राग आणि उद्वेग जाहीरपणे व्यक्त केला आहे’, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. इस्रायल सोबतच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला त्यांनी लक्ष्य केले. ‘केवळ मिस्टर मोदी हेच या प्रदेशातील — लेबनॉन, गाझा आणि ताब्यातील वेस्ट बँकसह — मिस्टर नेतन्याहू यांच्या कारवायांना खंबीरपणे पाठिंबा देत आहेत. मोदींचे इस्रायलवरील हे आंधळे प्रेम आपल्या देशाला खूप महागात पडत आहे’, असेही त्यांनी सुनावले.



























































