आयटीची ऐट संपली! वर्षभरात 70 हजार कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

हिंदुस्थानातील आयटी क्षेत्र गलेगठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र मागील आर्थिक वर्षात या क्षेत्रालाही कर्मचारी कपातीचे ग्रहण लागले आहे. या क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे काही प्रमुख आयटी कंपन्यानी तब्बल 70 हजार कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, इन्पहसिससह अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. क्रिसिल रेटिंग्सने एका अहवालात आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपातीचा दावा केला आहे. यापुढील काळातही आयटी क्षेत्र मंदीच्या छायेत असेल, असेही या अहवालात म्हटले आहे. क्रिसिल रेटिंग्सचे संचालक आदित्य झवेर यांनी सांगितले, तंत्रज्ञानावरील खर्चातील मंदी या आर्थिक वर्षातही कायम राहणार आहे. त्यामुळे आयटी सेवा प्रदात्यांच्या महसूल वाढीवर होईल. बीएफएसआय आणि किरकोळ क्षेत्रातील महसुलात चार-पाच टक्क्यांच्या मंद वाढीसह घट होत राहील, तर उत्पादन आणि आरोग्यसेवा 9-10 टक्क्यांनी वाढेल, असे झवेर म्हणाले.

गुगलने संपूर्ण टीम नोकरीवरून काढली

गुगल कंपनीने पायथनीची संपूर्ण टीम नोकरीवरून काढून टाकली. स्वस्त मजूर नियुक्त करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गुगल कॉस्ट कटिंगसाठी अमेरिकेबाहेरून स्वस्त कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहे. गुगल टीममध्ये दहा लोक काम करत होते. गुगल म्युनिक, जर्मनीमध्ये एक नवीन टीम तयार करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुगलने आठवडय़ाभरापूर्वीच 28 कर्मचाऱयांना नोकरीवरून काढून टाकले होते.

बंगळुरूमध्ये 150 कर्मचाऱ्यांना डच्चू

बंगळुरू येथील हेल्थटेक स्टार्टअप हेल्थीफाई कंपनीने 27 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच 150 लोकांना कामांवरून काढले. पंपनीने काढलेल्या कर्मचाऱयांमध्ये सेल्स आणि प्रोडक्टस् विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱयांना दोन महिन्यांचा पगार, विस्तारित विमा कव्हरेज, मर्यादित कालावधीसाठी कर्मचाऱयांची राहिलेली रक्कम दिली जाणार आहे. हेल्थीफाईचे को फाऊंडर – सीईओ तुषार वशिष्ठ यांनीही या कपातीसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे.