
सामना प्रतिनिधी। जळगाव
शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघात धरणगाव व जळगाव तालुक्यात झुरखेडा व अंजनविहिरे या गावाच्या मोठ्या पुलांच्या कामांसह लहान पूल व मोऱ्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात 10 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झुरखेडा व अंजनविहिरे गावाजवळ पुलाचे बांधकाम व्हावे अशी नागरिकांची मागणी होती त्याची दखल घेत गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून मतदार संघातील 12 गावांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दळण – वळणा साठी मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.
अशी होणार पुलांची कामे
शेतकरी व नागरिकांच्या सुरळीत रहदारीसाठी धरणगाव तालुक्यातील पाळधी – पथराड – झुरखेडा – दहिदुल्ला रस्ता प्रजामा 57 या रस्त्यावरील झुरखेडा गावाजवळ 2 कोटी 61 लक्ष व अंजनविहिरे गावाजवळ 1 कोटी 48 लक्ष या मोठ्या पुलाच्या कामांसह रेलफाट – रेल रस्ता ग्रामा. 11 गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे -39.69 लक्ष, विवरे ते भवर खेडा रस्ता ग्रा.मा. 4 वर पुलाचे बांधकाम करणे – 52.22 लक्ष तसेच जळगांव तालुक्यातील चिंचोली – धानवड रस्ता प्रजिमा 8 वरील धानवड गावजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे – 34.00 लक्ष ,जळके – वराड रस्ता इजिमा 43 जळके गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – 90.52 लक्ष, रामा 40 – सावखेडा फाटा ग्रा.मा.133 वर पुलाचे बांधकाम करणे – 34.76 लक्ष , ममुराबाद – खेडी बु.रस्ता इजिमा 88 ममुराबाद गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे -46.64 लक्ष , आव्हाणे – ममुराबाद रा.मा.43 रस्त्यावरील आव्हाणे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे 38.86 लक्ष , प्रजिमा 59 – भादली रस्ता ग्रा.मा.25 रस्त्यावर भादली गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – 57.51 लक्ष असे एकूण 12 गावांच्या दळण – वळणा चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून सुमारे 10 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.सदर कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया तात्काळ करण्याचे निर्देश ना.गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिले आहेत.

































































