जालना मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या! -शिवसैनिकांची आग्रही मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जालना

जालना मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, अशी आग्रही मागणी मंगळवारी शिवसैनिकांनी केली. या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाही दिल्या.

शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात आलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. प्रत्येक वेळी ते शिवसेनेच्या मदतीनेच निवडून येतात. मात्र ते कधीही युतीचा धर्म पाळत नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडवून घ्यावा अथवा या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊ द्यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला.

या वेळी शिवसैनिकांची समजूत काढताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी तसेच सर्व पदाधिकाऱयांसाठी लक्ष्मणरेषा आहे, असे सांगितले. या वेळी उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, पंडित भुतेकर, तालुकाप्रमुख माधव हिवाळे, संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, कैलास पुंगळे, भूषण शर्मा, राजू शेळके, सुरेश तळेकर, कुंडलिक मुठे, गजानन मुळे, शेख आबेद, सखाराम लोखंडे, विभागप्रमुख विठ्ठल गावंडे, युवासेनेचे नदीमखाँ पठाण, अन्सरखाँ पठाण, शेख आजम, बाबुराव करफळे, महेश पुरोहित, गबाजी आस्माद, अनिल लोखंडे आदींची उपस्थिती होती.