सगेसोयरे, कुणबीबाबत कायदा पारित केला नाही तर विधानसभेला 288 जागी मराठा उमेदवार उभे करणार – जरांगे-पाटील

सगेसोयरे आणि कुणबी याबाबत राज्य सरकारने सहा जूनपर्यंत कायदा पारित केला नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार आणि मराठय़ांची ताकद दाखवून देणार, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. तर, लोकसभा निवडणुकीत संघटनेने कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा केला नाही आणि कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मतदानाबाबत मराठा समाजाने समजून-उमजून निर्णय करावा. एखादा उमेदवार उभा करण्यापेक्षा एखाद्या उमेदवाराला पाडणे हे सोपे असते,’ असेही ते म्हणाले.

राजू शेट्टी हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत म्हणून पाठिंबा देणार काय? यावर त्यांनी या प्रक्रियेत आपण नाही असे स्पष्ट केले. धनगर, मुस्लिम, शेतकरी, बारा बलुतेदार अशांचीही एकजूट करणार आहे. प्रथम महाराष्ट्रातील मराठा समाजाची एकजूट करताना दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या राज्यांतील मराठा समाजाला संघटित करणार असल्याचे सांगितले. आमचा राजकीय पक्ष नाही; पण उद्याच्या काळात काय होईल ते सांगता येणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करावे, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

मराठा समाजाच्या मताची भीती वाटावी, अशी ताकद निर्माण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रचारासाठी आणले जात असल्याचा आरोप करत याला भाजपमधील मोजके लोक जबाबदार आहेत, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले.