नरेश गोयल यांना अखेर दिलासा, हायकोर्टाचा ईडीला दणका

कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. गोयल यांच्या जामिनाला विरोध करणाऱया सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चांगलाच दणका बसला आहे.

न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने गोयल यांना सर्शत एक लाख रुपयांचा अंतरिम जामीन मंजूर केला. सुनावणी न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा, अशा अटी न्यायालयाने गोयल यांना घातल्या आहेत.

गोयल व त्यांच्या पत्नीला कर्करोग आहे. पत्नी जेमतेम दोन महिन्यांची सोबती आहे. अंतिम क्षणी तिच्या सोबत राहायचे आहे. त्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती गोयल यांनी केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. कर्करोगाशी झुंज देणाऱया पत्नी सोबत गोयल यांना आता राहता येईल. गोयल यांची बाजू ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी मांडली.

ईडीला चपराक

गोयल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच रुग्णालयात त्यांच्या पत्नीवरही उपचार होत आहेत. गोयल तेथे त्यांना भेटू शकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. त्यासाठी अंतरिम जामीन देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद करत ईडीने गोयल यांच्या जामिनाला विरोध केला होता. हा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने ईडीला चांगलीच चपराक दिली आहे.