जोगेश्वरीतील रस्त्यावर गतीरोधक नसल्याने अपघातांचा धोका, वाहतूक पोलिसांकडून ‘एनओसी’ देण्यास वेळकाढूपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर ते पूनमनगरपर्यंतच्या रस्त्याचे महापालिकेच्या माध्यमातून काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र चार-पाच महिने उलटून गेल्यानंतरही या रस्त्यावर गतीरोधक बसवलेले नाहीत. वाहतूक पोलिसांकडून ‘एनओसी’ देण्यास वेळकाढूपणा केला जात असल्याने गतीरोधकचे काम रखडल्याचे समजते. परिणामी, भरधाव वेगाने धावणाऱया वाहनांपासून जिवघेणे अपघात घडण्याचा धोका संभावत आहे.

काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केलेल्या रस्त्यावरील म्हाडा कॉलनी, कोकण नगर, सर्वोदय नगर या भागात तीव्र उतार आहे. तसेच या भागात बालविकास विद्यामंदिर व इतर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहने वेगाने चालवली जात आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन ते चार ठिकाणी गतीरोधक बसवण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका शिवानी परब यांनी पालिका प्रशासन आणि पोलीस खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी यासंदर्भात पालिका सभागृहात आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासनाकडून गतीरोधकचा प्रस्ताव पुढे सरकला. मात्र सध्या संबंधित प्रस्ताव वाहतूक पोलिसांच्या ‘एनओसी’च्या प्रतिक्षेत रखडल्याचे समजते. गतीरोधकाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कामाची रखडपट्टी झाली आहे. तीव्र उतारामुळे या रस्त्यावर गेल्या चार-पाच महिन्यांत अनेक अपघात झाले असून प्रशासन जीवघेण्या अपघाताची वाट पाहतेय की काय? वाहतूक पोलिसांनी गतीरोधक बसवण्यासाठी वेळीच एनओसी द्यावी आणि जीवघेण्या अपघातांचा धोका टाळावा, अशी मागणी नगरसेविका शिवानी परब यांनी केली आहे.