
एकीकडे पाऊस लांबला असतानाच नवी मुंबई शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्बे धरणावर पाणीमाफियांनी दरोडा टाकला आहे. मुख्य जलवाहिनीचे व्हॉल्व्ह आऊट व्हॉल्व्ह तोडून तेथे बेकायदेशीरपणे जोडणी केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली असून त्याद्वारे सुमारे ४० लाख रुपये किमतीचे पाणी पळवले आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या पाणीमाफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जून महिना संपत आला असून पावसाचा टिपूसही नसल्याने सर्वांचे टेन्शन वाढले आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले असून २० टक्के पाणी कपातदेखील लागू केली आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथके नेमता केली असून परिसरात फिरून कोणत्या भागात चोरी होते याची रोज पाहणी केली जात आहे.
पाणीपुरवठा विभागाने पनवेलमधील विचुंबे आणि देवद गावाच्या हद्दीत एक्स्प्रेस वेच्या बाजूला असलेल्या मोर्बे धरणाच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडल्याचे आढळून आले. त्याठिकाणी बेकायदेशीरपणे नळजोडणी करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले.
- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष उर्वणे यांनी या पाणी चोरीची गंभीर दखल घेतली असून खांदेश्वर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.
- माफियांनी मोर्बे धरणातील पाण्यावर डल्ला मारत ३९ लाख ५७ हजार ५८० रुपये किमतीचे तब्बल ३ लाख ३२ हजार ४६५ घनमीटर पाणी चोरल्याचे आढळून आले आहे.
- ही चोरी उघडकीस आल्यानंतर मोर्बे धरणातील पाण्यावर विशेष वॉच ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय येथून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिन्यांवरदेखील लक्ष ठेवले जात आहे.
पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम
नवी मुंबई, पनवेल येथे आधीच पाणीटंचाई असून नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. मोर्बे धरणातील पाणीचोरी उघडकीस आल्यामुळे त्याचा मोठा फटका नवी मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. या चोरीमुळे नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे आढळून आले आहे.




























































