कणकवलीचा योगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवेक दिगंबर वैद्य,[email protected]

सिद्धसत्पुरुष ‘श्रीभालचंद्र महाराज’ यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणाऱया लेखाचा उत्तरार्ध.

भालचंद्राचे एकाएकी झोपेतून जागे होणे आणि मोठमोठय़ाने ‘श्रीराम जय राम जयजयराम’ या त्रयोदशोक्षरी मंत्राचा जप करणे घरच्या मंडळींसाठी अनाकलनीय होते. पुढे दिवस उजाडल्यापासून भालचंद्राने मौनव्रत स्वीकारले. कुणाशी बोलणे नाही, कुणाकडचे काही खाणे नाही, सदासर्वदा तिन्ही त्रिकाळ मुखी नामजप हेच त्याचे व्रत बनले. या दरम्यान गारगोटी येथे भालचंद्राचा परिचय सत्पुरुष श्रीमुळेमहाराज यांच्यासोबत झाला. ‘हे प्रकरण वेगळे असल्याचे’ लक्षात आल्याने श्रीमुळेमहाराजांनी भालचंद्रास श्रीसाटम महाराज यांच्यापाशी ‘दाणोली’ येथे जाण्यास व त्यांच्या सान्निध्य गुरुसेवा करण्यास सांगितले.

श्रीमुळेमहाराजांची आज्ञा ‘प्रमाण’ मानून भालचंद्र निघाला आणि आंबोली घाटातून थेट ‘दाणोली’ तीर्थक्षेत्री पोहोचला. येथे सद्गुरू श्रीसाटम महाराजांचे दर्शन घडताच भालचंद्र त्यांच्यात गुंतून गेला. श्रीगुरुचरणांची सेवा करणे हाच नेम अन् व्रत भालचंद्राने जाणले आणि तो श्रीमहाराजांच्या सेवेत मग्न राहू लागला. पुढे बऱयाच कालावधीनंतर तन्मयतेने श्रीगुरुसेवा आणि नामस्मरण करणाऱया भालचंद्राला श्रीसाटम महाराजांनी सांकेतिक आज्ञा केली त्यास ‘प्रमाण’ मानून भालचंद्र सर्वत्र संचार करून अखेरीस कणकवलीस स्थिरावला.

श्रीसाटम महाराजांच्या आज्ञेने कणकवली गाठलेल्या भालचंद्राच्या अंगावर तोवर वस्त्रही शिल्लक उरले नव्हते. डोक्यावरचे केस वाढून त्याच्या जटा झाल्या होत्या. दाढी-मिशीचे अस्ताव्यस्त जंगल आणि त्यातच सदानकदा मौन बाळगणे यामुळे कणकवली परिसरातील लोकांचा तो थट्टेचा विषय बनला. लहान मुले भालचंद्रास दगड, शेणाचे गोळे फेकून मारत असत, काही टारगट मंडळी त्याच्यामागे काठी घेऊन धावत, त्यास मारत व चिडवत. अनेक माकडचेष्टा करून त्यास हैराण करीत असत. भालचंद्र मात्र शांत व निश्चल राहात असे.

एकदा ग्रामस्थांच्या छळाला कंटाळून भालचंद्र एका झाडावर जाऊन बसला तेव्हा चावऱया लाल मुंग्यांनी त्याच्या देहाचे चावे घेतले.  अवघे शरीर लालजर्द मुंग्यांनी वेढले होते. शेकडो इंगळ्या एकाचवेळी डसाव्यात अशी वेदना होत असावी तरीही ध्यानस्थ भालचंद्राच्या चित्तवृत्तीवर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता हे दृश्य पाहून ग्रामस्थही चकित झाले. श्रीसाटम महाराजांच्या कृपाप्रसादाने योगमार्गात प्रवीण झालेल्या भालचंद्रावर नैसर्गिक प्रकोप आणि मानवनिर्मित छळ यांचा परिणाम होईनासा झाला. कडाक्याची थंडी, पावसाचा कहर आणि सोसाटय़ाचा वारा सहन करीत भालचंद्र अन्नपाणी न घेता दिवसेंदिवस निपचित पडून राहात असे. मात्र हा काळ खडतर होता. सिद्धसत्पुरुषांच्या प्राक्तनात, जोवर त्यांच्यातील देवत्व सिद्ध होत नाही तोवर भक्तांचे प्रेम मिळत नाही. साधुसंतांची ओळख पटणे, त्यांच्यातील दैवी शक्तीची प्रचीती येणे येथपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी नेहमीच कष्टप्रद आणि दुःखदायी असतो.

भालचंद्रास अनेकदा निंदा व हालअपेष्टा सहन करावी लागली. गावातील उनाड पोरे अंगावर चिखल, घाण टाकत असत. एकदा एका नरपशूने भालचंद्रास शेणाच्या गायरीत ढकलले. (शेण साठवण्यासाठी खोदलेला भलामोठा खड्डा). देहभान आधीच संपले होते. तहानभुकेची जाणीव उरलेली नव्हती. मुखाने अखंड नामस्मरण करीत भालचंद्र कित्येक दिवस गायरीतच बसून होता. काही दिवसांनंतर ही गोष्ट त्या उनाड पोरांच्या लक्षात आली तेव्हा सर्वजण गायरीपाशी आले. शेणात लडबडलेल्या भालचंद्राची ती विदेहावस्था पाहून त्यांच्यातीलच एक उनाड पोर कळवळले. त्याने भालचंद्रास तेथून बाहेर काढले. आंघोळ घालून, स्वच्छ करून, पेजपाणी देऊन त्यास सावध केले. एकदा एका रिकामटेकडय़ा टवाळाने भालचंद्राच्या अंगावर कागद व पेन्सिल टाकली तेव्हा भालचंद्र हसला व कागदावर वेडय़ावाकडय़ा रेघोटय़ा आखू लागला. उत्सुकतेपोटी ते टवाळ पोर पुढे सरसावले तेव्हा भालचंद्राने कागदावर ‘भालचंद्र परशुराम ठाकूर’ अशी फडर्य़ा इंग्रजीत सही ठोकल्याचे पाहून ते पोर अन् गंमत पाहण्यासाठी जमलेली अन्य मंडळी गपगार झाली. ज्याला आपण वेडा समजतो तो चक्क साक्षर असावा हे पाहून त्यांचे आणि पुढे अनेकांच भालचंद्राबद्दलचे मत बदलू लागले. पुढे भालचंद्राने प्रतिकूल परिस्थितीचा ज्या सहजतेने स्वीकार केला ते पाहून कणकवलीकर त्यास शरण गेले. या कारणाने पुढे भालचंद्राचा ‘श्रीभालचंद्र महाराज’ होण्यास फार काळ जावा लागला नाही.

एकदा कणकवली येथे साथीचा रोग पसरला. सावधगिरीचा उपाय म्हणून ग्रामस्थ अन्यत्र जाऊ लागले. श्रीभालचंद्र महाराजांनी मात्र गाव सोडले नाही. त्यांच्यासोबत राहिलेले काही ग्रामस्थ इतकेच नव्हे तर कुत्र्यामांजरासारखे मुके जीवसुद्धा रोगाच्या प्रकोपामध्ये सुरक्षित  राहिले हे पाहून कणकवलीकरांची श्रीमहाराजांविषयीची श्रद्धा दृढ झाली. श्रीमहाराजांचा कायमस्वरूपी मुक्काम काशीविश्वेश्वराच्या मंदिरासमोर पुंडलिक साबाजी कामत या सत्पुरुषाच्या समाधीपाशी झाला. याच कामत घराण्यातील रामचंद्र मोरेश्वर कामत यांनी समाधीस लागून एक पडवी बांधली आणि तेथे श्रीभालचंद्र महाराजांच्या राहण्याची सोय केली. पुढे श्रीमहाराज तेथे कायमचे वास्तव्य करते झाले.

श्रीमहाराजांची दिनचर्या म्हणजे ते तासन्तास नामस्मरणात दंग असत, वारंवार समाधीत मग्न असत. त्यांना खाण्यापिण्याचे भान नसे. आजूबाजूचे कुणी भक्त खाण्याचे पदार्थ आणून देत, मात्र देहभान असेल तरच श्रीमहाराज खात असत, अन्यथा कुत्री-मांजरी येऊन त्या अन्नाचा फडशा पाडत. श्रीमहाराजांना त्याचे काहीच वाटत नसे. बरेचदा श्रीमहाराज खात असता जनावरेही त्यांच्या ताटातील अन्न खात असत तेव्हा श्रीमहाराज त्यांना प्रेमाने कुरवाळत असत. श्रीमहाराज सदोदित मौन बाळगून असत. अधूनमधून सिगारेट ओढत. बरेचदा लोक त्यांच्याकडे गाऱहाणे घेऊन येत तेव्हा श्रीमहाराजांनी त्यांना सिगरेटचा चटका दिला म्हणजे ‘कृपाप्रसाद’ मिळाला अशी त्यांची भावना होत असे.

चमत्कार अथवा भावभक्तीचे अवडंबर न माजविणारे श्रीभालचंद्र महाराज केवळ ईश्वराचे साधक होते. देहभावाच्या पलीकडे जाऊन केवळ ईश्वरप्राप्तीचा मोह बाळगणारा हा सिद्धसत्पुरुष 18 डिसेंबर 1977 रोजी मुंबईच्या लालबाग परिसरात देह विसर्जित करता झाला. श्रीमहाराजांची समाधी कणकवली येथे आहे. कणकवलीस जाणाऱया श्रद्धाळू भाविकांनी श्रीमहाराजांच्या समाधीची आवर्जून भेट घ्यावी.