
कर्नाटकातील भाजप सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ऍण्टी करप्शन ब्युरो) चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाच धमक्या दिल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हाच ‘कलेक्शन सेंटर’ बनला आहे, असे जोरदार ताशेरे ओढणारे न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांना बदलीच्या धमक्या मिळत आहेत. यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संबंधित एका प्रकरणाची गेल्या आठवडय़ात कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायमूर्ती संदेश यांच्यासमोर सुनावणी झाली. जमिनीचा वाद मिटविण्यासाठी नायब तहसीलदार पी. एस. महेश यांनी पाच लाखांची लाच घेतली होती. विशेष म्हणजे बंगळुरू शहर उपायुक्त यांच्या कार्यालयातच नायब तहसीलदार महेश यांनी लाच घेतली. जामिनाच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती संदेश यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर जोरदार ताशेरे ओढले. 2016 पासूनच्या दाखल केलेल्या सर्व तक्रारींचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, न्यायमूर्ती संदेश यांनी खडसावल्यानंतर आयएएस अधिकारी आणि बंगळुरू शहर उपायुक्त जे. मंजुनाथ यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहवाल सादर केला नाही.
न्यायमूर्तींनी धमकीची नोंद रेकॉर्डवर घेतली
आपल्याला बदलीची धमकी आल्याची माहिती न्यायमूर्ती संदेश यांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सीमांत कुमार सिंग हे शक्तीशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे बदलीची धमकी दिली जाईल, असे मला सहकारी न्यायमूर्तींनी सांगितले आहे. या धमकीची नोंद मी रेकॉर्डवर घेत आहे, असे न्या. संदेश यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यच भ्रष्टाचाराने किडलेले
यावेळी न्यायमूर्ती संदेश यांनी कर्नाटक सरकारवरही जोरदार ताशेरे ओढले. आदेश देऊनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एडीजीपींचे सव्वीस रेकॉर्ड सादर का केले नाही? अशी विचारणा त्यांनी या विभागांच्या वकिलांकडे केली. आता तर न्यायमूर्तींना धमक्या देण्यापर्यंत मजल गेली आहे. संपूर्ण राज्यच भ्रष्टाचाराने किडलेले आहे, असे न्यायमूर्तींनी एसीबीच्या वकिलांना सुनावले.
मी शेतकऱयाचा मुलगा; धमक्यांना घाबरत नाही
मी मालमत्ता जमा केलेली नाही. जनतेच्या हितासाठी बदली झाली किंवा माझे पद गेले तरी हरकत नाही. पण मांजराच्या गळय़ात मी घंटा बांधायला तयार आहे. मी शेतकऱयाचा मुलगा आहे. मी जमीन नांगरायला तयार आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मी कोणतीही राजकीय विचारधारा मानत नाही, अशा स्पष्ट शब्दात न्यायमूर्ती संदेश यांनी आपली भूमिका मांडली.




























































