खवटी येथे इको कारच्या धडकेत पादचारी जखमी; कारचालकावर गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी गावानजीक भरधाव वेगातील मारुती इको कारने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. जितेंद्र रामचंद्र दुवे (47) असे या जखमी पादचाऱ्यांचे नाव असून तो महामार्गावरील खवटी नाका ते भारतवाडी असा पायी चालला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र दुवे हा बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील खवटी नाका येथून भारतवाडी येथे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील मारुती इको कारने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात जितेंद्र याचा डावा पाय फॅक्चर झाला असून त्याच्या डोक्याला आणि तोंडालाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात कार चालक अक्षय हनुमंत मुद्दे (35) याच्या विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.