
सामना प्रतिनिधी । कावलून
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. त्याने उप उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाच्या एच. एस. प्रणॉयला 18-21, 30-29, 21-18 असे पराभूत केले. पहिला गेम श्रीकांतला गमवावा लागला. मात्र त्याने चांगलीच झुंज दिली. पण तीन गुणांच्या फरकाने गेम प्रणॉयच्या नावावर झाला. दुसर्या गेममध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. हा गेम हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेला. अखेर 30-29 अशा गुणसंख्येवर श्रीकांतने तो गेम जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. तिसरा गेमदेखील अटीतटीचा झाला. या गेममध्ये पहिल्या गेमची पुनरावृत्ती झाली. फक्त हा गेम प्रणॉयऐवजी श्रीकांतने जिंकला आणि प्रणॉयला घरचा रस्ता दाखवला.




























































